विद्यार्थ्यांसाठीही नोकरीआधी ‘एक्झिट’ परीक्षा?

By admin | Published: January 9, 2017 04:05 AM2017-01-09T04:05:41+5:302017-01-09T04:05:41+5:30

‘एमबीबीएस’ विद्यार्थ्यांना पदवीनंतर डॉक्टरी व्यवसायाची प्रत्यक्ष सनद देण्याआधी त्यांची ‘एक्झिट’ परीक्षा घेण्याच्या प्रस्तावानंतर आता तसाच विचार

Student's 'Exit' exam before job? | विद्यार्थ्यांसाठीही नोकरीआधी ‘एक्झिट’ परीक्षा?

विद्यार्थ्यांसाठीही नोकरीआधी ‘एक्झिट’ परीक्षा?

Next

नवी दिल्ली : ‘एमबीबीएस’ विद्यार्थ्यांना पदवीनंतर डॉक्टरी व्यवसायाची प्रत्यक्ष सनद देण्याआधी त्यांची ‘एक्झिट’ परीक्षा घेण्याच्या प्रस्तावानंतर आता तसाच विचार अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या बाबतीत अ.भा. तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) करीत असून परिषदेच्या येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत यावर विचार व्हायचा आहे.
परिषदेने तसा निर्णय घेऊन नियम केल्यास सरकारी व खासगी अशा दोन्ही प्रकारच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या बाजारात पदार्पण करण्यासाठी केवळ पदवी असणे पुरेसे होणार नाही. त्यांना पदवीच्या शेवटच्या वर्षात, त्यांचे ज्ञान नोकरीच्या दृष्टीने कितपत उपयुक्त आहे याचे मूल्यमापन करणारी, एक स्वतंत्र परीक्षाही द्यावी लागेल. ही परीक्षा सर्वांना सक्तीची असेल व त्या परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीची माहिती त्यांना जेथे नोकरी मिळू शकते अशा संभाव्य मालकांना उपलब्ध करून दिली जाईल.
देशात अभियांत्रिकी पदवी व पदविका अभ्यासक्रम शिकविणाऱ्या सुमारे तीन हजार संस्था आहेत व त्यातून दरवर्षी सात लाख पदवीधर इंजिनीयर उत्तीर्ण होऊन बाहेर पडतात. परंतु त्यापैकी जेमतेम २० ते ३० टक्के विद्यार्थ्यांनाच चांगली नोकरी मिळू शकते. या विद्यार्थ्यांकडे पुस्तकी ज्ञान असले तरी प्रत्यक्ष उद्योग-धंद्यांना आवश्यक असलेले व्यावहारिक कौशल्य, कल आणि काही तरी वेगळा विचार करण्याची प्रवृत्ती नसल्याने पदवी असूनही असे विद्यार्थी शिक्षण असूनही नोकरीक्षम ठरत नाहीत.
केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाच्या सूत्रांनुसार देशातील अभियांत्रिकी शिक्षणाचा घसरत चाललेला दर्जा हेही याचे कारण आहे. अशी परीक्षा घेतल्याने विद्यार्थ्यांनाही नोकरीच्या बाजारातील आपले स्थान कळेल व कोणत्या शिक्षण संस्था व्यवहार्य शिक्षण देण्यात कमी पडतात हेही समोर येईल.
याच पार्श्वभूमीवर सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने
‘ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिट्युट टेस्ट इन इंजिनियरिंग’ (गेट) ही परीक्षा अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सक्तीची करण्याची शिफारस केली होती. सध्या ही परीक्षा प्रामुख्याने देशातील आयआयटींमध्ये एम. टेकच्या प्रवेशांसाठी वापरली जाते. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Student's 'Exit' exam before job?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.