एफटीआयआयचे विद्यार्थी गुन्हेगार नाहीत - राहुल गांधी
By admin | Published: August 19, 2015 01:27 PM2015-08-19T13:27:43+5:302015-08-19T13:45:12+5:30
एफटीआयआयचे विद्यार्थी गुन्हेगार नसल्याचे सांगत मौन, निलंबन व अटक हाच मोदींच्या 'अच्छे दिन'चा मंत्र आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - पोलिसांनी मध्यरात्री एफटीआयआयच्या कॅम्पसमध्ये शिरून विद्यार्थ्यांना अटक केल्याप्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ' एफटीआयआयचे विद्यार्थी गुन्हेगार नसल्याचे सांगत गप्प करा, निलंबित करा व अटक करा हाच मोदींच्या 'अच्छे दिन'चा मंत्र आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. एफटीआयआयचे संचालक प्रशांत पाठरांबे यांनी विद्यार्थ्यांविरोधात दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी काल रात्री सव्वाच्या सुमारास कॅम्पसमध्ये प्रवेश करून ५ विद्यार्थ्यांना अटक करत त्यांना डेक्कन जिमखाना पोलिस स्थानकात नेले. पोलिसांच्या या कारवाईचा सर्वत्र निषेध होत असून हा वाद आणखीनच चिघळला आहे.
त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनीही या घटनेबद्दल नाराजी नोंदवली आहे. ' मोदीजी, ( एफटीआयआयचे) हे विद्यार्थी गुन्हेगार नाहीत. गप्प करा,निलंबित करा व अटक करा हाच मोदींच्या 'अच्छे दिन'चा मंत्र आहे' असे ट्विट करत राहुल यांनी सरकारवर टीका केली आहे. यापूर्वीही राहुल यांनी एफटीआयआच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला होता. गेल्या महिन्यात आंदोलनाच्या ५० व्या दिवशी राहुल यांनी पुण्यात विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी शिक्षण संस्था तसेच अन्य संस्थांमध्ये भाजपा हस्तक्षेप करत असून विद्यार्थ्यांवर संघाचे विचार लादण्याचा प्रयत्न सुरू आहेत अशी टीका करत त्यांनी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला.
गजेंद्र चौहान यांची निवड गुणवत्तेवर झाला नसल्याचा आरोप करत चौहान यांच्यासह नियामक मंडळाच्या सदस्यांची नियुक्ती रद्द करावी, या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत गजेंद्र चौहान यांना पद सोडण्याचा सल्ला दिला. मात्र चौहान हे पायउतार होण्यास तयार नसून दुसरीकडे विद्यार्थीही त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत.