नीटच्या ‘त्या’ प्रश्नपत्रिकांसाठी मोजले ३५ ते ६० लाख; CBI तपासात धक्कादायक गोष्टी उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 05:24 AM2024-07-26T05:24:57+5:302024-07-26T05:25:37+5:30
काही राज्यांतील विद्यार्थ्यांनी या प्रश्नपत्रिकेसाठी ५५ ते ६० लाख रुपये मोजले होते.
एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : नीट-यूजी परीक्षेत बिहारमधील काही विद्यार्थ्यांनी फुटलेली प्रश्नपत्रिका ३५ ते ६० लाख रुपये देऊन विकत घेतली होती, अशी महत्त्वपूर्ण माहिती सीबीआयने केलेल्या तपासातून उघड झाली आहे, तर दुसऱ्या राज्यांतील विद्यार्थ्यांनी या प्रश्नपत्रिकेसाठी ५५ ते ६० लाख रुपये मोजले होते. सुमारे १५० विद्यार्थ्यांना फुटलेली प्रश्नपत्रिका मिळाली याचे पुरावे सीबीआयला मिळाले आहेत. त्यातील काही जणांचे झारखंडमधील हजारीबाग व लातूर येथे परीक्षा केंद्र होते.
प्रश्नपत्रिका मिळालेल्यांपैकी काही जणांचे परीक्षा केंद्र गुजरातमधील गोध्रा, बिहारची राजधानी पाटणा येथे होते. या शहरांमध्ये विशिष्ट शाळांतच परीक्षा केंद्रे असावीत यासाठी काही विशेष प्रयत्न झाले होते का, याचाही सीबीआय तपास करत आहे. ज्या १५० जणांना प्रश्नपत्रिका मिळाली, त्यातील ८० ते ९० जणांना चांगले गुण मिळालेले नाहीत.
मुख्य सूत्रधार अद्याप फरार
या कारस्थानाचा मुख्य सूत्रधार संजीव मुखिया अद्याप फरार आहे. त्याच्या काही साथीदारांना याआधीच अटक केली असून त्यामध्ये रॉकी, चिंटू यांचा समावेश आहे. रॉकी याने ओॲसिस शाळेत नेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या प्रती चोरल्या होत्या. त्यानंतर चिंटूच्या माध्यमातून त्या बिहारमध्ये पाठविण्यात आल्या. चिंटू हा मुखियाच्या भाचीचा पती आहे.
बहुतांश आरोपी नवादा जिल्ह्याचे रहिवासी
प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणातील बहुतांश आरोपी बिहारमधील नवादा जिल्ह्याचे रहिवासी आहे. बिहारमधील जलसंपदा विभागाचे तत्कालीन इंजिनिअर सिकंदर यादवेन्दू यांचा मेव्हणा असलेल्या संजीवचा मुलगा अनुराग याला ३५० गुण मिळाले आहेत. त्याच्यासोबत आयुष राज, शिवनंदनकुमार, अभिषेककुमार यांनीही नीट-यूजी परीक्षा दिली होती. त्यातील केवळ आयुष राजला ६०० गुण मिळाले आहेत. नीट-यूजी गैरप्रकारांच्या तपासाबाबत सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.