विद्यार्थिनी, महिलांना मासिक पाळीची सुट्टी? सुप्रीम कोर्टात सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 11:06 AM2023-02-16T11:06:33+5:302023-02-16T11:06:44+5:30
पुढील आठवड्यात सुप्रीम कोर्टात सुनावणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सर्व राज्यांना विद्यार्थिनी आणि नोकरदार महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या कालावधीत रजा देण्याचे नियम तयार करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मान्य केले.
तातडीच्या यादीसाठी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर याचिका सूचीबद्ध करण्यात आली होती. २४ फेब्रुवारीला त्याची नोंद करावी, असे खंडपीठाने सांगितले. दिल्लीचे रहिवासी शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी दाखल केलेल्या याचिकेत मातृत्व लाभ कायद्याचे पालन करण्यासाठी राज्यांना निर्देश देण्याची मागणी केली. ॲड.विशाल तिवारी म्हणाले की, ब्रिटन, चीन, जपान, तैवान, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, स्पेन आणि झांबिया देशांत मासिक पाळीच्या सुट्टीची तरतूद केलेली आहे. बिहार हे एकमेव राज्य आहे, जे १९९२ पासून मासिक पाळीच्या दरम्यान महिलांना दोन दिवसांची विशेष रजा देत आहे.