विद्यार्थ्यांनी बंडखोरंच असायला हवं, त्याशिवाय बदल कसा घडणार - प्रकाश जावडेकर
By admin | Published: July 7, 2016 06:23 PM2016-07-07T18:23:16+5:302016-07-07T18:23:16+5:30
भारतामध्ये शिक्षणामध्ये नावीन्य दिसत नाही कारण मुलांना प्रश्न विचारण्यापासून रोखलं जातं. ही प्रथा बंद व्हायला हवी असं मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - भारतामध्ये शिक्षणामध्ये नावीन्य दिसत नाही कारण मुलांना प्रश्न विचारण्यापासून रोखलं जातं. ही प्रथा बंद व्हायला हवी असं मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं असून नावीन्यासाठी बंडखोरीही आवश्यक असल्याचं ते गुरुवारी म्हणाले.
तुम्ही बंडखोर नसाल, आहे त्या परिस्थितीला बदलण्यासाठी आव्हान देत नसाल तर बदल कसा घडेल, नावीन्य कसं येईल असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. शिक्षणामध्ये बदल घडवण्याचं, नावीन्य आणण्याचं आमचं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
कुतूहल दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण प्रोत्साहन देत नाही, प्रश्न विचारण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत नाही असं निरीक्षण जावडेकरांनी नोंदवलं आहे. मुलांना प्रश्न पडले पाहिजेत आणि त्यांनी ते विचारले पाहिजेत असंही जावडेकरांनी म्हटलं आहे.
जर मुलांमधलं कुतूहल जागृत केलं तर नावीन्य येईल आणि परीवर्तन घडेल असेही त्यांनी स्पष्ट केले. आनंद बाझार पत्रिकेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
टिकाऊ व शाश्वत विकास हा मोदी सरकारचा मंत्र असून तो निसर्गाची हेळसांड करत नसल्याचे जावडेकर म्हणाले. अर्थात, त्यासाठी नवनवीन प्रयोग आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.
प्रसारमाध्यमांमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रानं क्रांती केली. नव्या कल्पना आल्या आणि बदल झाला असा दाखला त्यांनी दिला. स्टीव्ह जॉब्जनी 1990 मध्ये स्मार्ट फोनचं आणि त्याच्या विविध उपयोगांचं भाकीत केलं होतं याची आठवण जावडेकरांनी यावेळी करून दिली.