विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे धावू नये : योगी आदित्यनाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 12:52 PM2019-08-23T12:52:48+5:302019-08-23T12:53:32+5:30
टेक्निकल इन्स्टीट्यूटच्या विद्यार्थ्यांनी वातावरणातील प्रदुषण कमी करण्यासाठी समोर येण्याची आवश्यकता आहे. तसेच गरिबांना घर बविण्यासाठी योगदान देण्याची गरज आहे.
नवी दिल्ली - विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केल्यानंतर लगेचच नोकरीच्या मागे धावू नये, असा सल्ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी विद्यार्थ्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी नोकरी मागे न धावता समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असंही त्यांनी नमूद केले. देशात वाढत्या बेरोजगारीच्या काळात योगी यांच्या या सल्ल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मदन मोहन मालवीय टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभात ते बोलत होते.
दिक्षांत समारंभामुळे गुरुकुलची परंपरा जीवंत राहिली आहे. यामुळेच विद्यार्थ्यांना नेहमी खरं बोलण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे ते सत्याच्या मार्गावर चालतात. योगी आदित्यनाथ म्हणाले की, इंजिनियरींगचे विद्यार्थी अनेक क्षेत्रात भरीव योगदान देऊ शकतात. प्रत्येक घरासाठी नळ या योजनेसाठी विद्यार्थ्यांनी समोर यायला हवं. ही योजना २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असून याचा उद्देश प्रत्येक घरात पाणी पोहचविण्याचं असल्याचे त्यांनी नमूद केले.
टेक्निकल इन्स्टीट्यूटच्या विद्यार्थ्यांनी वातावरणातील प्रदुषण कमी करण्यासाठी समोर येण्याची आवश्यकता आहे. तसेच गरिबांना घर बविण्यासाठी योगदान देण्याची गरज आहे. तंत्रज्ञानामुळे अन्नधान्याचा पुरवठा जनतेपर्यंत करणे सोपं झालं आहे. आधार कार्डला रेशन कार्डशी लिंक करण्यात आले.तसेच रेशन दुकानांवर सेल मशिन लावण्यात आल्याचे योगींनी सांगितले.
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, मागील २५ वर्षांपासून मी इन्सेफेलाइटिस या आजारावर मोठं काम करत आहे. १९७७ ते २०१७ या कालावधीत या आजारामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. परंतु, राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही अनेक जनजागृतीचे कार्यक्रम राबविले. त्यामुळे इन्सेफेलाइटिसची लढा देण्यास मदत झाली.