विद्यार्थ्यांच्या स्टार्टअपला ३ कोटींचे भांडवल
By admin | Published: March 17, 2017 01:16 AM2017-03-17T01:16:07+5:302017-03-17T01:16:07+5:30
येथील एका शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या चेतन गोलेच्छा, मृगांक गुज्जर आणि उत्सव जैन या तीन विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप कंपनीला ३ कोटींचे भांडवल मिळाले आहे
जयपूर : येथील एका शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या चेतन गोलेच्छा, मृगांक गुज्जर आणि उत्सव जैन या तीन विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप कंपनीला ३ कोटींचे भांडवल मिळाले आहे. ‘इन्फ्युजन बेव्हरेजेस’ या नावाची त्यांची कंपनी असून, ती सुगंधी पाणी बनविते.
हे तिघे जयपूरमधील नीरजा मोदी शाळेचे विद्यार्थी आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी एका उद्योजकता महोत्सवात सहभाग घेतला होता. वर्षभरातच त्यांचा उपक्रम एका कंपनीत रुपांतरित झाला आहे. चेतन गोलेच्छा याने सांगितले की, आमचे उत्पादन महोत्सवातील परीक्षकांना आवडले नव्हते. आम्ही पहिल्या फेरीतच बाद होऊन स्पर्धेबाहेर फेकले गेलो. मात्र, या महोत्सवाच्या पहिल्या एक तासातच आम्हाला १५0 बाटल्यांची आॅर्डर मिळाली. लोकांना आमचे सुगंधी पाणी आवडले होते.
मृगांक गुज्जरने सांगितले की, प्रीझर्वेटिव्ह तसेच साखर आणि सोडा न वापरता सुगंधी पाणी तयार करणे ही आमची मध्यवर्ती कल्पना होती. त्यासाठी आम्ही गुगलवर खूप संशोधन केले. पण आम्ही अल्पवयीन असल्यामुळे आम्हाला कोणतीही सरकारी परवानगी मिळू शकत नव्हती. सर्व परवानग्या आम्हाला पालकांच्या नावे मिळवाव्या लागल्या.
या त्रिकूटाने आयआयटी कानपूर आणि आयआयएम इंदूर यांच्या उद्योजकता स्पर्धेतही भाग घेतला. मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेने त्यांना साह्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना मोठे बळ मिळाले. त्यांना पेटंट मिळण्यासाठी संस्थेने मदत केली. त्यांचा अर्ज आता अंतिम टप्प्यात आहे. केवडा, गुलाब आणि बेल यांचा सुगंध असलेले पाणी ते सध्या उत्पादित करतात. जानेवारीपर्यंत त्यांनी ८ हजार बाटल्या विकल्या आहेत. उत्सव जैन याने सांगितले की, यंदा जानेवारीत एका गुंतवणूकदाराने त्यांना इंदुरात बोलावले. बैठक यशस्वी झाली. ३ कोटींचे भांडवल पुरविण्याचे त्याने मान्य केले. करारानुसार, प्रकल्प इंदुरात राहील. त्रिकूटाकडे मार्केटिंग आणि संशोधनाची जबाबदारी असेल. (वृत्तसंस्था)