विद्यार्थ्यांचे आंदोलन भडकावण्याचा प्रयत्न

By admin | Published: May 15, 2016 05:15 AM2016-05-15T05:15:38+5:302016-05-15T05:15:38+5:30

इस्लामिक स्टेट (इसिस) ही दहशतवादी संघटना भारतात अनेक कारवाया करणार असल्याची भीती अनेकदा व्यक्त होत आली आहे. मात्र आता हे वृत्त खरेच असल्याचे स्पष्ट झाले आहे

The students tried to provoke the agitation | विद्यार्थ्यांचे आंदोलन भडकावण्याचा प्रयत्न

विद्यार्थ्यांचे आंदोलन भडकावण्याचा प्रयत्न

Next

नवी दिल्ली : इस्लामिक स्टेट (इसिस) ही दहशतवादी संघटना भारतात अनेक कारवाया करणार असल्याची भीती अनेकदा व्यक्त
होत आली आहे. मात्र आता हे वृत्त खरेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजधानी दिल्लीतील जेएनयू व कन्हैया कुमार दरम्यान झालेल्या वादाच्या निमित्ताने आपल्या कारवाया सुरू करा, असा आदेश आपल्याला देण्यात आला होता, असे भारतातील इसिसमध्ये तरुणांना भरती करणाऱ्या म्होरक्यांनी दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.
जुनुद अल खलीफा-ए-हिंद (जेकेएच) या भारतातील इसिसच्या शाखेतील आशिक अहमद उर्फ राजा, मोहम्मद अब्दुल अहद आणि मोहम्मद अफजल या तिघांनी पोलिसांसमोर दिलेल्या जबाबातून ही बाब उघडकीस आली आहे.
जेएनयूमधील वादग्रस्त कार्यक्रमानंतर कन्हैयाकुमार देशद्रोहाच्या आरोपाखाली तिहार तुरुंगात असताना, त्याच्या सुटकेसाठी अनेक विद्यापीठातील हजारो विद्यार्थी आंदोलन करत होते. त्याचवेळी इसिसच्या अहमद अलीने पश्चिम बंगालमधील १९ वर्षीय आशिक अहमद उर्फ राजाला या आंदोलनात सहभागी होऊन वाहनांची जाळपोळ तसेच तोडफोड करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
एनआयएने इसिसशी संबंधित व्यक्तीचे जबाब भारतीय दंडविधानाच्या कलम १६४ अंतर्गत नोंदवून घेतले आहेत. या तिघांनी आपल्या जबानीत बंगळुरू, पश्चिम बंगाल व पंजाबमधील बैठकीत उपस्थित होतो, असे कबूल केले आहे.
आशिकने दिलेल्या जबाबानुसार, अहमद अली हा स्वत:ची अन्सर-उत तौहीद फि बिलाद अल-हिंद अशी ओळख सांगत असे. त्याने १९ फेब्रुवारी रोजी ट्रिलियन अ‍ॅपवरील अकाऊंटद्वारे माझ्याशी संपर्क साधला होता. सुरक्षा यंत्रणा आपल्यावर नजर ठेवून असल्याचे त्याने सांगितले होते. यावेळी देशभरात विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू असून, आपण त्याचा फायदा उठवला पाहिजे. या आंदोलनात सहभागी होऊन हिंसाचार घडवून आणाला, असेही तो मला म्हणाला, असे आशिकने नमूद केले.
हा अहमद अली म्हणजे भारतातील इसिसचा प्रमुख शफी अरमार असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला असून, तो नुकताच अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेल्याचे वृत्त आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: The students tried to provoke the agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.