अभ्यासाच्या वह्या, पाण्याचा जार, सायकल स्वस्त होणार; विम्यावर सूट; घड्याळे, बूट महागणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 05:44 AM2024-10-20T05:44:24+5:302024-10-20T05:45:10+5:30
जीएसटी १८ टक्क्यांवरून ५% करण्याची मंत्रिगटाची शिफारस
नवी दिल्ली: २० लिटरचा पाण्याचा जार, सायकल, अभ्यासाच्या वह्या स्वस्त होण्याची शक्यता आहे. जीएसटी दरांच्या सुसूत्रीकरणासाठी स्थापित मंत्रिगटाने शनिवारी यावर लागू असलेला कर ५ टक्के करण्याची शिफारस केली आहे. यासोबतच महागडी मनगटी घड्याळे आणि बुटांवर कर वाढवण्याचा सल्ला दिला आहे. जीएसटी परिषद यावर अंतिम निर्णय घेईल.
बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटात उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेशकुमार खन्ना, राजस्थानचे आरोग्यमंत्री गजेंद्रसिंह, कर्नाटकचे महसूलमंत्री कृष्ण बायर गौडा आणि केरळचे अर्थमंत्री के. एन. बालगोपाल आदींचा समावेश आहे. या निर्णयामुळे सुमारे २२ हजार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होईल.
विम्यावर मिळणार सूट
- मुदतीचा जीवन विमा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या आरोग्य विम्याच्या हप्त्याची रक्कम करमुक्त हाेऊ शकते.
- ज्येष्ठ नागरिकांशिवाय इतर व्यक्तींना पाच लाखांपर्यंत संरक्षण असलेल्या आरोग्य विम्यावर जीएसटीमध्ये सूट देण्याचा निर्णयही मंत्रिगटाने घेतला आहे.
- पाच लाखांहून अधिक संरक्षण असलेल्या विमा हप्त्यावर १८ टक्के जीएसटी कायम राहील.
घड्याळे, बूट महागतील
१५ हजार रुपयांहून अधिक किमतीचे बूट व २५ हजारांहून अधिक किंमत असलेल्या मनगटी घड्याळांवर असलेला १८ टक्के जीएसटी २८ टक्के करण्याची शिफारस केली आहे.