महामृत्युंजय' मंत्राच्या जपाने रुग्णांना मिळतंय 'जीवदान'? आरएमएलमध्ये होतेय संशोधन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 01:48 AM2019-09-13T01:48:26+5:302019-09-13T06:45:17+5:30
येत्या दोन महिन्यांत या संशोधनाचा अंतिम निष्कर्ष कळणार आहेत.
नवी दिल्ली : गंभीर आजारावर वैद्यकीय उपचार करण्याबरोबरच अनेकदा आस्थेने महामृत्युंजय मंत्राचा जप रुग्ण करतात. या मंत्राचा जप केल्याने खरंच रुग्णाच्या आरोग्यावर परिणाम होतो का? याचे संशोधन डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉक्टर करत आहेत. या मंत्राप्रति लोकांच्या श्रद्धा व विश्वासाला विज्ञानिक दृष्टीने सिद्ध करण्याचा प्रयत्न या संशोधनातून केला जाणार आहे. मेंदूचे विकार असलेल्या रुग्णांना हा मंत्र ऐकवण्याचा देशातील हा पहिलाच प्रयोग आहे.
येत्या दोन महिन्यांत या संशोधनाचा अंतिम निष्कर्ष कळणार आहेत. आरएमएलमधील न्यूरोसर्जन डॉ. अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांची टीम याचा अभ्यास करत आहे. २०१६ मध्ये पीरियॉडिक फास्टिंगवर संशोधन करणाऱ्या जपानी डॉक्टरला नोबेल पारितोषिक मिळाले होते. या संशोधनात त्यांनी उपवास करणाºया लोकांच्या शरीरातील आजाराची निर्मिती करणाºया पेशी संपून जातात. खासकरून कर्करोगाच्या पेशी नष्ट होत असल्याचे सांगितले आहे.
आपल्या देशातही महामृत्युंजय मंत्र लोकांना जीवनदान देणारा म्हणून मानला जातो. मात्र याचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करण्यात आलेला नाही. त्यामुळे या मंत्राचे संशोधन करण्याचा निर्णय आम्ही घेतला. यासाठी इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) निधी दिल्याची माहिती डॉ. चौधरी यांनी दिली आहे.
संस्कृत विद्यापीठाची मदत
गेल्या तीन वर्षापासून चाळीस लोकांची टीम हे काम करत आहे. मेंदूचे आजार असलेल्या रुग्णांना दोन गटात विभागून, त्या रुग्णांवर नियमित उपचार करण्यात आले; परंतु एका गटातील रुग्णांना महामृत्युंजय मंत्र ऐकवण्यात आले. यासाठी कुतुबमिनार स्थित संस्कृत विद्यापीठाची मदत घेण्यात आली आहे. महामृत्युंजय मंत्राचे पठण करण्यासाठी रुग्णांना संस्कृत विद्यापीठात पाठवण्यात आले. या मंत्राचा किती परिणाम या रुग्णांवर होतोय याचा मंत्र न म्हणणाऱ्या गटाबरोबर अभ्यास केला जाईल. त्यानंतरचा अहवाल मेडिकल जर्नलमध्ये पाठवण्यात येणार आहे.