राष्ट्रगीतासाठी सक्तीने उभे करणे हा न्यायालयाचा मूर्खपणा!
By admin | Published: December 28, 2016 02:41 AM2016-12-28T02:41:16+5:302016-12-28T02:41:16+5:30
‘चित्रपटगृहांमध्ये प्रत्येक खेळाच्या आधी राष्ट्रगीत वाजविले जावे आणि त्या वेळी प्रत्येकाने आदराने उभे राहावे, अशी सक्ती करणारा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला
नवी दिल्ली : ‘चित्रपटगृहांमध्ये प्रत्येक खेळाच्या आधी राष्ट्रगीत वाजविले जावे आणि त्या वेळी प्रत्येकाने आदराने उभे राहावे, अशी सक्ती करणारा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा मूर्खपणा आहे व ही न्यायालयाने आपले अधिकारक्षेत्र सोडून केलेली ढवळाढवळ आहे,’ अशी टीका ख्यातनाम इतिहासतज्ज्ञ एमजीएस नारायणन यांनी केली आहे.
‘मातृभूमी’ या साप्ताहिकास दिलेल्या मुलाखतीत नारायणन म्हणाले की, ‘खरे तर न्यायालयाच्या या आदेशावर टीका करण्याची गरजही नाही. कारण लोकांच्या
मनात राष्ट्रभावना नसेल, तर ते हा आदेश पाळणार नाहीत व तो
निरर्थक ठरेल हे उघड आहे.’ ते म्हणाले की, ‘लोक चित्रपटगृहांमध्ये मनोरंजनासाठी येतात. तेथे त्यांना राष्ट्रप्रेमाचे डोस बळजबरीने पाजण्याची गरज नाही.’
प्राचीन भारतीय इतिहासाचे तज्ज्ञ असलेले नारायणन भारतीय इतिहास संशोधन परिषद या केंद्र सरकारच्या अखत्यारितील संस्थेचे अध्यक्ष होते व राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या या आधीच्या सरकारने त्यांची नेमणूक केली होती.
नारायणन म्हणाले की, भारत हे इतिहासात कधी एका विचाराने बांधलेले राष्ट्र होते, असे निदान मी तरी मानत नाही. फार तर आपण भारताला अठरापगड राष्ट्रीयत्वांचा महासंघ, असे म्हणू शकू.
राष्ट्रीयता आणि राष्ट्रभक्तीच्या सक्तीचे असे होणारे प्रयत्न हे मूठभरांच्या हुकूमशाहीचे द्योतक आहे व लोकशाहीच्या विरोधी आहे, असेही ते म्हणाले.
त्यांचे असेही म्हणणे होते की, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ५१(१) मधील भाषा पाहिली, तर देश आणि राष्ट्रीय प्रतीके यांच्याविषयीचा आदर न्यायालयीन सक्तीने निर्माण केला जाऊ शकत नाही, हे स्पष्ट
होईल.
स्वत: सर्वोच्च न्यायालयासही याचे भान आहे व म्हणूनच
‘जेओव्हाज विटनेस’ या ख्रिश्चन समाजातील मुलांना शाळेत राष्ट्रगीत म्हणण्याच्या सक्तीच्या विरोधात न्यायालयाने १९८६ मध्ये निकाल दिला होता. एवढेच नव्हे, तर आपली संस्कृती आणि धार्मिक तत्त्वज्ञान आपल्याला सहिष्णुततेची शिकवण देते, हेही न्यायालयोन त्या निकालात अधोरेखित केले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मुळात लोकांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना असेल, तर राष्ट्रगीताला अर्थ आहे. तसे असेल तर राष्ट्रगीताविषयी आदरही आपोआप व्यक्त होईल. राष्ट्रीयत्वाची भावना बळजबरीने निर्माण केली जाऊ शकत नाही. असे सक्तीचे प्रयत्न झाले, तर त्याचा उलटा परिणाम होईल.
- एमजीएस नारायणन,
प्राचीन भारतीय इतिहासाचे तज्ज्ञ