आठवी नापास पत्नीला बनवलं सब इन्स्पेक्टर, राजस्थान पेपर लीक प्रकरणातील मास्टमाईंडचा कारनामा, असा रचला प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 01:54 PM2024-03-06T13:54:33+5:302024-03-06T13:54:49+5:30
Rajasthan Paper Leak Case:
राजस्थान पेपर लीक प्रकरणामध्ये दररोज नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. या प्रकरणातील मास्टरमाईंड हर्षवर्धन याला पोलिसांनी अटक केली आहे. तपासामध्ये आरोपी हा अनेक वर्षांपासून परीक्षांमध्ये हेराफेरी करत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, राजस्थान लोकसेवा आयोगाने २०२१ मध्ये सब इन्स्पेक्टर आणि प्लाटून कमांडर भरती परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेमध्ये आरोपी हर्षवर्धन याने पेपर लीक आणि डमी उमेदवारांच्या माध्यमातून ५० हून अधिक उमेदवारांना उत्तीर्ण केले होते.
दरम्यान, पोलीस तपासामध्ये हर्षवर्धन याने अनेक उमेदवारांनाच नाही तर त्याच्या आठवी नापास पत्नीलाही पोलीस भरती परीक्षेत उत्तीर्ण केले होते. हर्षवर्धनने आधी पत्नीसाठी चुकीच्या पद्धतीने बीएची पदवी मिळवली. त्यानंतर डमी उमेदवाराच्या माध्यमातून तिला सब इन्स्पेक्टरच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण केले होते. त्याशिवाय पेपर लीक प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत १६ आणखी आरोपींना अटक केली आहे. यामध्ये सहा महिला सब इन्स्पेक्टर आणि सब इन्स्पेक्टर कृपाल सिंह यांचा समावेश आहे. कृपाल सिंह हा नागौरच्या डेप्युटी एसपींचा मुलगा आहे. सब इन्स्पेक्टरचं प्रशिक्षण घेत असलेले ३५ आरोपी आणि या परीक्षेमध्ये अव्वल आलेला आरोपी नरेश विश्नोई हाही पोलिसांच्या अटकेत आहे.
पकडण्यात आलेल्या आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्याशिवाय अनेक आरोपी ट्रेनिंग सेंटरमधून फरार झाले आहेत. राजस्थान पेपर लीक प्रकरणामध्ये एका तपास अधिकाऱ्याने सांगितले की, भरती परीक्षेमध्ये पहिल्या आलेल्या एका व्यक्तीसह १५ प्रशिक्षणार्थी पोलीस उप-निरीक्षकांना फुटलेल्या प्रश्नपत्रिका आणि डमी उमेदवारांची मदत घेऊन (२०२१) परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी हर्षवर्धन हा आश्रमही चालवतो, तसेच तिथे तो लोकांना प्रवचन देत असल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र आता त्याचा खरा चेहरा समोर आला आहे.