Anita Bose: “महात्मा गांधी हे नेताजींसह अनेकांचे प्रेरणास्थान”; अनिता बोस यांचे कंगनाला प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 11:28 AM2021-11-18T11:28:27+5:302021-11-18T11:29:55+5:30

Anita Bose: महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांचे नाते गुंतागुंतीचे होते. पण नेताजींनी नेहमीत गांधीजींचा आदर केला, असे अनिता बोस यांनी म्हटले आहे.

subhas chandra bose daughter anita bose reacts kangana ranaut mahatma gandhi and netaji comment | Anita Bose: “महात्मा गांधी हे नेताजींसह अनेकांचे प्रेरणास्थान”; अनिता बोस यांचे कंगनाला प्रत्युत्तर

Anita Bose: “महात्मा गांधी हे नेताजींसह अनेकांचे प्रेरणास्थान”; अनिता बोस यांचे कंगनाला प्रत्युत्तर

Next

नवी दिल्ली:महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आणि माझे वडील नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhas Chandra Bose) हे दोघेही देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील महान नायक होते. महात्मा गांधी यांनी नेताजींसह अनेकांना प्रेरित केले आहे. महात्मा गांधीजी अनेकांचे प्रेरणास्थान आहेत, या शब्दांत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी बॉलिवूड क्विन कंगना रणौत (Kangana Ranaut) हिच्यावर पलटवार केला आहे. कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर केलेल्या दोन पोस्टमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून, देशभरातून कंगनावर टीका करण्यात येत आहे. 

स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांबद्दल अनादर दाखवणाऱ्या बेताल विधानांवर नेताजी बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी कंगनाला कानपिचक्या दिल्या. नेताजी देशात परतले असते तर त्यांना ब्रिटिशांच्या ताब्यात देण्याची तयारी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि महमद अली जिन्ना यांनी एका ब्रिटिश न्यायाधीशाकडे दाखवली होती. भगत सिंग यांच्या फाशीला गांधीजींचा पाठिंबा होता. त्यासंबंधी पुरावेही उपलब्ध असल्याचा दावा कंगनाने केला. मात्र, या दाव्यांना अनिता बोस यांनी कोणताही दुजोरा दिलेला नाही.

महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांचे नाते गुंतागुंतीचे होते

महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांचे नाते गुंतागुंतीचे होते. नेताजींचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी असल्यामुळे नेताजींना आपल्या नियंत्रणात ठेवता येणार नाही, असे गांधीजींना वाटत होते. परंतु, माझे वडील नेहमीच गांधीजींचे प्रशंसक राहिले. त्यांनी गांधीजींचा आदर केला. स्वातंत्र्य लढ्यातील आपण करत असलेल्या कामाबद्दल गांधींजी काय म्हणत आहेत, हे नेताजी नेहमी जाणून घेण्यास उत्सुक असत. गांधीजी आणि नेताजी यांचे उद्दिष्ट एकच होते पण, त्यांचे मार्ग वेगवेगळे होते. त्यांच्यातील या मतभेदात पंडित नेहरूंना कोणाची बाजू घ्यायची नव्हती. नंतर नेहरू गांधीवादी समर्थकांमध्ये सहभागी झाले, ही गोष्टही लक्षात घ्यायला हवी, असे अनिता बोस यांनी स्पष्ट केले आहे. 

गांधीजी व नेताजींचे कार्य एकमेकांना पूरक होते

गांधीजी व नेताजींचे स्वातंत्र्य लढ्यातील कार्य एकमेकांना पूरक होते. फक्त अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळेल असे काँग्रेसला वाटत होते पण, हे खरे नव्हते. नेताजी आणि त्यांच्या आझाद हिंद सेनेचे योगदानही मोठे होते, असे स्वातंत्र्यानंतर उपलब्ध झालेल्या कागदपत्रांच्या आधारे असे म्हणता येईल. असे असले तरी फक्त नेताजींमुळे स्वातंत्र्य मिळाले असे म्हणणेही चुकीचे ठरेल. कोणा एकामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही. महात्मा गांधी यांनी देशातील लाखो लोकांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले होते, अगदी नेताजींनाही, असेही अनित बोस यांनी म्हटले आहे. अनिता बोस यांनी ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीशी बोलताना आपले मत व्यक्त करत कंगनावर पलटवार केला.

काय म्हणाली होती कंगना रणौत?

कंगना रणौतने इंस्टाग्राम स्टोरीजवर दोन मोठे संदेश पोस्ट करत आपल्या आधीच्या विधानाबाबत भूमिका मांडली. गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना समर्थन दिले नाही. भगतसिंगच्या फाशीला गांधींचा पाठिंबा होता, असे बरेच पुरावे आहेत. यामुळे कोणाचे समर्थन करावे हे तुम्ही ठरवले पाहिजे. कारण या सर्व गोष्टी मनात ठेवून त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणे पुरेसे नाही. खरे तर हे मौन अतिशय बेजबाबदार आणि वरवरचे आहे. प्रत्येकाला त्यांचा इतिहास आणि आदर्शाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्यांना सत्तेच्या भुकेल्या आणि धूर्त लोकांनी त्यांच्या मालकांच्या स्वाधीन केले होते. हे तेच लोक होते ज्यांनी त्यांचे शोषण केले. यांच्यात लढण्याची हिंमत नव्हती किंवा त्यांचे रक्तही उसळले नाही. हेच लोक आम्हाला शिकवतात, जर तुम्हाला कोणी थप्पड मारली तर दुसर्‍या गालावर दुसरी थप्पड खा आणि अशा प्रकारे तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. पण कोणालाही असे स्वातंत्र्य मिळत नाही. अशा प्रकारे फक्त भीक मिळते. म्हणून आपले आदर्श हुशारीने निवडा, असे कंगनाने म्हटले होते. 
 

Web Title: subhas chandra bose daughter anita bose reacts kangana ranaut mahatma gandhi and netaji comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.