शांती सेनेच्या परिषदेत सुभाष भामरे
By Admin | Published: September 7, 2016 04:24 AM2016-09-07T04:24:34+5:302016-09-07T04:24:34+5:30
संयुक्त राष्ट्राच्या जागतिक शांती सेनेची आंतरराष्ट्रीय परिषद यंदा लंडनच्या लँकेस्टर हाऊस येथे होणार असून, १00 पेक्षा अधिक देशांचे संरक्षणमंत्री व परराष्ट्र व्यवहारमंत्री सहभागी होत आहेत.
सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
संयुक्त राष्ट्राच्या जागतिक शांती सेनेची आंतरराष्ट्रीय परिषद यंदा लंडनच्या लँकेस्टर हाऊस येथे होणार असून, १00 पेक्षा अधिक देशांचे संरक्षणमंत्री व परराष्ट्र व्यवहारमंत्री सहभागी होत आहेत. भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची पंतप्रधान मोदींनी निवड केली आहे.
गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्राच्या पीस किपींग आॅपरेशनसह विविध विषयांवर चर्चा करण्यास राष्ट्रप्रमुखांची परिषद न्यूयॉर्कला झाली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व पंतप्रधान मोदींसह ५0 राष्ट्रप्रमुख या परिषदेला उपस्थित होते. आता जागतिक शांती सेनेच्या कार्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी, संरक्षण व परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची जागतिक परिषद लंडन्मध्ये होत आहे. परिषदेत भारताच्या अपेक्षा, संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमांना सहकार्य, या विषयी भारताची भूमिका डॉ. भामरे मांडतील.
शांततेसाठी भारताने कायम तत्परता दाखवली असल्याने, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व व सहभाग असलाच पाहिजे, ही आग्रही मागणीही ६ ते ८ सप्टेंबर होणाऱ्या परिषदेत डॉ. भामरे मांडतील. याखेरीज भारत-इंग्लंड दरम्यानच्या द्विपक्षीय वार्तालापासाठी ते ब्रिटनच्या संरक्षण तसेच परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा करतील. लंडनमधील डॉ. आंबेडकरांच्या स्मारकालाही ते भेट देणार आहेत.