सुभाष चंद्रा, नायडू, सिब्बल, नकवी विजयी
By admin | Published: June 12, 2016 06:32 AM2016-06-12T06:32:31+5:302016-06-12T06:32:31+5:30
राज्यसभा निवडणुकीत झालेल्या एका मोठ्या राजकीय उलथापालथीत हरियाणात भाजपाने पाठिंबा दिलेले माध्यमसम्राट सुभाष चंद्रा विजयी झाले. काही काँग्रेस आमदारांनी केलेल्या बंडामुळे
- हरीश गुप्ता, नवी दिल्ली
राज्यसभा निवडणुकीत झालेल्या एका मोठ्या राजकीय उलथापालथीत हरियाणात भाजपाने पाठिंबा दिलेले माध्यमसम्राट सुभाष चंद्रा विजयी झाले. काही काँग्रेस आमदारांनी केलेल्या बंडामुळे ही घडामोड घडली.
विशेष म्हणजे काँग्रेस श्रेष्ठींनी भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे उमेदवार आर.के. आनंद यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, माजी मुख्यमंत्री भूपिंद्रसिंग हुडा यांच्या समर्थकांनी त्यास विरोध केल्याचे वृत्त आहे. काँग्रेसच्या १७ पैकी १३ आमदारांनी मतदान करताना चुकीची पद्धती व शाई वापरली आणि मतदान केले. त्यामुळे निर्वाचन अधिकाऱ्यांनी त्यांची मते फेटाळून लावली. या घडामोडीचा हरियाणात लवकरच परिणाम दिसून येईल. आतापर्यंत अशा प्रकारची घडामोड काँग्रेसमध्ये कधीही कोणत्याही राज्यात घडली नव्हती. समर्थकांनी बंडखोरी केल्याच्या आरोपाचा हुडा गटाने इन्कार केला आहे. उलट आर.के. आनंद यांचा पराभव करून भारतीय
राष्ट्रीय लोकदलाने दुहेरी खेळी केल्याचा आरोप या गटाने केला आहे. विशेष
म्हणजे स्वत: आनंद यांनी शुक्रवारीच काँग्रेसला आपला पाठिंबा राहील, असे जाहीर केले होते.
भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मुत्सद्देगिरीचा दुसरा परिणाम झारखंडमध्ये दिसून आला. तेथे भाजपाने पाठिंबा
दिलेले अपक्ष उमेदवार महेश पोद्दार
विजयी झाले. त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाने पाठिंबा दिलेले बसंत सोरेन यांचा
पराभव केला. छोटे पक्ष आणि अपक्षांनी पोद्दार यांना पाठिंबा दिल्याने ही घडामोड घडली.
कर्नाटकात फुटली जनता दलाची मते
कर्नाटकात काँग्रेसचा एक जादा उमेदवार विजयी झाला. तेथे काँग्रेसचे के.सी. राममूर्ती यांनी जनता दल एसचे बी.एम. फारुख यांचा पराभव केला. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांना बसलेला हा सर्वांत मोठा फटका आहे.
पक्षाकडे निधीची चणचण असल्याने त्यांनी श्रीमंत उमेदवारांना उमेदवारी दिली होती. या राज्यात काँग्रेसने तीनही जागा आरामशीर जिंकल्या. पक्षाचे जयराम रमेश, आॅस्कर फर्नांडिस आणि राममूर्ती विजयी झाले. भाजपच्या निर्मला सीतारामन यांना चौथी जागा गेली.
बसपामुळे काँग्रेसला तीन जागा
उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या राज्यांत बहुतांशी बसपाने दिलेल्या पाठिंब्याने काँग्रेसने ३ जागा जिंकल्या. उत्तर प्रदेशात काँग्रेसचे कपिल सिब्बल २५ मते मिळवू शकले. बसपाने पाठिंबा दिला नसता, तर कदाचित त्यांना पराभव स्वीकारावा लागला असता. बसपाने आपल्या दुसऱ्या पसंतीची मते त्यांना दिली. त्यामुळे भाजपाच्या प्रीती महापात्रा यांना पराभूत व्हावे लागले. बसपाने काँग्रेसचे प्रदीप तामता यांना पाठिंबा दिल्याने भाजपाच्या गीता ठाकूर यांचा पराभव झाला. मध्य प्रदेशात काँग्रेसचे विवेक तनखा विजयी झाले. त्यांनी भाजपाने पाठिंबा दिलेले विनोद गोटिया यांचा पराभव केला.
- शनिवारी राज्यसभेच्या 27 जागांसाठी मतदान झाले. यापैकी भाजपाने १२ जागा जिंकल्या. त्यात अपेक्षेपेक्षा दोन जागा जास्त मिळाल्या. दुसरीकडे काँग्रेसने सहा जागा जिंकून आपले संख्याबळ वाढविले. या पक्षाला पाच जागांची अपेक्षा होती. सपाला सात जागांवर विजय मिळाला.
- राजस्थानात अपेक्षेप्रमाणे भाजपाने सर्व चारही जागा जिंकल्या. तेथे काँग्रेसने पाठिंबा दिलेले कमल मोरारका पराभूत झाले.
----------------------------------
राज्यसभा निवडणूकीचा निकाल (२७ जागा)
राज्यसभेच्या २७ जागांसाठी झालेल्या मतदानात भाजपाला १२ तर काँग्रेसला ६ जागा जिंकता आल्या. विजयी उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे-
उत्तर प्रदेश (११) :
अमर सिंह, बेनीप्रसाद वर्मा, कुंवर रेवती रमन सिंह, विश्वंभर प्रसाद निषाद, सुखराम सिंह यादव, संजय सेठ, सुरेंद्र नागर - सपा
सतीश चंद्र मिश्रा, अशोक सिद्धार्थ - बसपा
कपिल सिब्बल - काँग्रेस
शिवप्रताप शुक्ल - भाजपा
भाजपा पुरस्कृत अपक्ष प्रीति महापात्रा पराभूत.
राजस्थान (४) :
व्यंकय्या नायडू, ओपी माथुर, हर्षवर्धन सिंह, रामकुमार वर्मा - भाजपा
काँग्रेस पुरस्कृत कमल मोरारका पराभूत.
कर्नाटक (४) :
आॅस्कर फर्नांडीज, जयराम रमेश, के.सी. राममूर्ती - काँग्रेस
निर्मला सीतारमन - भाजपा
मध्यप्रदेश (३) :
एम.जे.अकबर, अनिल माधव दवे - भाजपा
विवेक तन्खा - काँग्रेस
भाजप पुरस्कृत अपक्ष विनोद गोटिया पराभूत.
झारखंड (२) :
मुख्तार अब्बास नकवी, महेश पोद्दार - भाजपा
हरियाणा (२) :
वीरेंद्र सिंह - भाजपा
सुभाष चंद्रा - भाजपा पुरस्कृत
उत्तराखंड (१) :
प्रदीप टम्टा - काँग्रेस