Corona Vaccination: “३ दिवसांत कोरोना लसीकरण प्रमाणपत्र जमा करा अन्यथा पगार मिळणार नाही”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 08:52 AM2021-05-30T08:52:15+5:302021-05-30T08:54:30+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश येताच कर्मचाऱ्यांची तारांबळ झाली. जिल्हा चिकित्सक अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना ३ दिवसांत लसीकरण प्रमाणपत्र जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
फिरोजाबाद – कोरोना संकटकाळात संसर्गाचा धोका लक्षात घेता सरकारने लसीकरण मोहिमेवर भर दिला आहे. उत्तर प्रदेशात मोठ्या संख्येने लोक लसीचे डोस घेत आहेत. परंतु फिरोजाबाद येथे अनेक सरकारी विभाग असे आहेत जिथे कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत लस घेतलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी एक फर्मान सोडलं आहे की, ३ दिवसांत लसीकरण प्रमाणपत्र जमा करा अन्यथा पगार मिळणार नाही असा इशाराच दिला आहे.
फिरोजाबाद जिल्हाधिकारी च्रंद्रविजय सिंह यांना माहिती मिळाली की, अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी लसीचे डोस घेतले नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी आदेश काढलेत. त्यात ज्या कर्मचाऱ्यांनी अथवा अधिकाऱ्यांनी लसीचे डोस घेतले नाहीत त्यांना मे महिन्याचं वेतन देऊ नये असं म्हटलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश येताच कर्मचाऱ्यांची तारांबळ झाली. जिल्हा चिकित्सक अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना ३ दिवसांत लसीकरण प्रमाणपत्र जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सरकारी आदेश निघताच अनेक कर्मचाऱ्यांनी लसीकरण केंद्राकडे धाव घेतली आहे. याबाबत मुख्य विकास अधिकारी चर्चित गौंड यांनी सांगितले की, ज्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही अशांना पगार देऊ नका असं जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटलं. जिल्ह्यात असे अनेक कर्मचारी होते ज्यांनी लसीकरण केले नव्हते. जर सरकारी कर्मचारी लस घेणार नाहीत तर सर्वसामान्य लोकांवर त्याचा विपरित परिणाम होईल असं जिल्हाधिकाऱ्यांना वाटतं. त्यामुळे हे आदेश काढल्यानंतर लसीकरण करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी रांगा लावल्या होत्या.
आदेशानंतर लसीकरण केंद्रावर रांगा
जेव्हा आम्ही स्वत: विकास भवनला जाऊन पाहिले तेव्हा कर्मचारी लस घेताना दिसले. आतापर्यंत ज्यांनी लस लावली नव्हती तेदेखील रांगेत होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या पाऊलाने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे लसीकरण होईल. त्यातून कोरोना बचावासाठी लसीकरणाचं महत्त्व नागरिकांना पटवून देता येईल असं चर्चित गौंड म्हणाले. तर मी लसीकरण करून आलोय, आतापर्यंत माझी औषधं सुरु असल्याने लस घेतली नव्हती. परंतु मी आता लस घेतली आहे. साहेबांनी जे आदेश दिले ते योग्य असल्याचं ग्रामविकास अधिकारी अनिल कुमार यांनी सांगितले.