निर्भया बलात्कारातील अहवाल सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 03:01 AM2019-06-05T03:01:18+5:302019-06-05T03:01:33+5:30
दोषींना लवकरात लवकर फाशी द्या अशी याचिका निर्भयाच्या आईवडिलांनी न्यायालयात सादर केली आहे.
नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात होत असलेल्या विलंबाबद्दल तिहार कारागृहाच्या अधीक्षकांना पतियाळा हाऊस न्यायालयाने नोटीस बजावली आहे. या गुन्हेगारांच्या स्थितीबद्दल १९ जुलैपर्यंत अहवाल सादर करावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
दोषींना लवकरात लवकर फाशी द्या अशी याचिका निर्भयाच्या आईवडिलांनी न्यायालयात सादर केली आहे. निर्भया प्रकरणातील सहापैकी मुकेश, पवन, विनय, अक्षय या चौघांना फाशीची शिक्षा होणार आहे. एकाने तुरुंगातच आत्महत्या केली तर आणखी एक जण अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. त्याची तिथून मुक्तता झाली आहे. चारही दोषींनी फाशीची शिक्षा रद्द व्हावी यासाठी केलेले दया अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळून लावले आहेत.
निर्भया प्रकरणातील दोषींनी चोखाळलेले कायदेशीर मार्ग तसेच त्यांनी दाखल केलेली एखादी याचिका अद्याप अनिर्णित असेल तर त्याची सर्व माहिती पतियाळा हाऊस न्यायालयाने तिहार कारागृहाच्या अधीक्षकांकडून मागवली आहे. निर्भयाची आई आशादेवी यांनी सांगितले की, माझ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना लवकर फाशी देण्यात यावे. त्यादृष्टीने केंद्र व राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा.
जनहित याचिका फेटाळली
चारही गुन्हेगारांना लवकर फाशी द्यावे, अशी विनंती करणारी याचिका आई-वडिलांनी फेब्रुवारीत याचिका दाखल केली. निर्भया या
२३ वर्षीय युवतीवर दिल्लीमध्ये १६ डिसेंबर २०१२ रोजी चालत्या बसमध्ये सहा जणांनी बलात्कार केला होता. तिला बेदम मारहाण करण्यात आली.