सुब्रमण्यम स्वामींना हवे ‘जेएनयू’चे कुलपतिपद
By admin | Published: September 25, 2015 02:55 AM2015-09-25T02:55:30+5:302015-09-25T02:55:30+5:30
डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्या पुनर्वसनाच्या प्रयत्नाला लागलेल्या मोदी सरकारने प्रतिष्ठित जेएनयू कुलगुरुपदी त्यांच्या नियुक्तीचा घाट घातला असतानाच संभ्रम आणि वादाचे मोहोळ उठले आहे.
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्या पुनर्वसनाच्या प्रयत्नाला लागलेल्या मोदी सरकारने प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलगुरुपदी त्यांच्या नियुक्तीचा घाट घातला असतानाच संभ्रम आणि वादाचे मोहोळ उठले आहे. स्वामी यांना विद्यापीठाचे कुलगुरू बनविले जाणार असल्याच्या बातम्या उमटल्या; मात्र त्यांना कुुलगुरू नव्हे तर कुुलपतिपद हवे असल्याचे वृत्त समोर आले आहे.
स्वामींना पूर्ण कॅबिनेट मंत्र्याचा दर्जाही हवा आहे. त्यांनी घातलेल्या दोन अटी मोदी सरकारसाठी अडचणींच्या ठरू शकतात. या विद्यापीठाला असलेले नेहरूंचे नाव बदलून सुभाषचंद्र बोस यांचे नाव दिले जावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थ्यांना काढून टाकण्याचा (रस्टिकेट) अधिकारही त्यांना हवा आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाने स्वामींच्या पूर्वअटींना उत्तर देण्याचे टाळले आहे. या विद्यापीठाचे कुलगुरू एस.के. सोपोरी हे लवकरच निवृत्त होत असून त्यांच्या जागेवर स्वामींचा डोळा असल्याच्या बातम्या अलीकडेच प्रसिद्ध झाल्या. या पदासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. स्वामींनी जाहिरातीनुसार अर्ज केलेला नाही. दुसरी बाब म्हणजे जेएनयूसह केंद्रीय विद्यापीठांमध्ये कुलगुरुंच्या निवृत्तीचे वय ७० वर्षे असताना वयाची ७६ वर्षे गाठलेले स्वामी अपात्रच ठरतात. स्वामींनी मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांची भेट घेतल्यानंतर अफवांना जोर चढला. ४० वर्षांपूर्वी आयआयटी दिल्लीत असताना स्वामींना बडतर्फ करण्यात आले होते.