सुब्रमण्यम स्वामींनी NSA अजित डोवालना केले टार्गेट
By Admin | Published: July 12, 2017 12:37 PM2017-07-12T12:37:14+5:302017-07-12T12:46:08+5:30
जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चहूबाजूंनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका सुरु आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चहूबाजूंनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका सुरु आहे. आता भाजपाचेच खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एनएसए अजित डोवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वामी यांच्या टि्वटवरुन त्यांचा रोख डोवाल यांच्याकडे असल्याचे दिसत आहे. 25 जूनलाच दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याची माहिती सरकारला मिळाली होती. मग या हल्ल्यासाठी नोकरशाहीमध्ये कोणाला जबाबदार धरणार ? असा सवाल टि्वटमधून विचारला आहे.
जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांच्या पत्राच्या आधारे स्वामींनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. मुनीर खान यांनी दहशतवादी अमरनाथ यात्रेकरुंना लक्ष्य करु शकतात असे लष्कर, सीआरपीएफला पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. जवळपास 15 दिवसांपूर्वी गुप्तचर यंत्रणांनी जम्मू काश्मीर प्रशासनाला अमरनाथ यात्रेला धोका असल्याचा अलर्ट दिला होता. संध्याकाळच्या वेळेस बसेसची वाहतूक थांबवून हल्ला टाळता येणं शक्य होतं. 25 जून रोजी चंदिगड येथे जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि गुप्तचर खात्याच्या अधिका-यांची एक बैठक पार पडली होती.
आणखी वाचा
अमरनाथ यात्रा, गुप्तचर यंत्रणांनी 15 दिवसांपूर्वीच दिला होता हल्ल्याचा इशारा
भारताच्या जेम्स बॉण्डला हटवण्यासाठी #SackDoval ट्रेंड
अमरनाथ यात्रेतील मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत
या बैठकीत अमरनाथ यात्रेकरुंवर होणा-या हल्ल्याची माहिती देण्यात आली होती. आज स्वामींनी जो प्रश्न विचारलाय तोच प्रश्न काल काँग्रेसने विचारला होता. हल्ल्याची आगाऊ माहिती होती मग हल्ला रोखण्यासाठी वेळीच पावले का नाही उचलली ? असा सवाल सरकारला विचारण्यात आला होता. स्वामी यांनी यापूर्वी सुद्धा अजित डोवाल यांना टार्गेट केले आहे. एप्रिल महिन्यात त्यांनी काश्मीरमधल्या अस्थिर परिस्थितीसाठी अजित डोवाल यांना जबाबदार धरले होते.
Since the Govt had prior information and warning as early as June 25th, somebody in the bureaucracy is accountable! Who? PTs can guess?
— Subramanian Swamy (@Swamy39) July 11, 2017
अजित डोवाल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीय वर्तुळात त्यांचा समावेश होतो. अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्यानंतर स्वामींनी राज्यातील सरकार बर्खास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा-पीडीपी आघाडीचे सरकार आहे. दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात ७ भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले.