'पद्मावती चित्रपटामागे आंतरराष्ट्रीय षडयंत्र, मुस्लिम राजांना हिरो दाखवण्यात यावं अशी दुबईतील लोकांची इच्छा'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 03:10 PM2017-11-10T15:10:28+5:302017-11-10T15:12:58+5:30
'आजकाल अशा प्रकारचे अनेक चित्रपट येत असून, त्यासाठी प्रचंड पैसा खर्च केला जात आहे. मुस्लिम राजांना हिरोप्रमाणे समोर आणावं अशी दुबईतील लोकांची इच्छा आहे. तसंच हिंदू महिला त्यांच्याशी नातं जोडण्यासाठी तयार होत्या असं दाखवण्यात येत आहे'.
नवी दिल्ली - पद्मावती चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादात आता भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनीही उडी घेतली आहे. यामागे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सुब्रहमण्यम स्वामी बोलले आहेत की, 'आजकाल अशा प्रकारचे अनेक चित्रपट येत असून, त्यासाठी प्रचंड पैसा खर्च केला जात आहे. मुस्लिम राजांना हिरोप्रमाणे समोर आणावं अशी दुबईतील लोकांची इच्छा आहे. तसंच हिंदू महिला त्यांच्याशी नातं जोडण्यासाठी तयार होत्या असं दाखवण्यात येत आहे'. सुब्रहमण्यम स्वामींनी पद्मावतीच्या निर्मात्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हिंदू महिलांची बदनामी करण्यासाठी दुबईहून पैसा येत असल्याचा आरोप केला आहे.
सुब्रहमण्यम स्वामी यांनी यावेळी जोधा - अकबर चित्रपटाचाही उल्लेख केला. 'याआधी जोधा - अकबर चित्रपट आला होता. त्यातही असंच दाखवण्यात आलं होतं', असं सुब्रहमण्यम स्वामी बोलले आहेत. काँग्रेसवर आरोप लावताना सुब्रहमण्यम स्वामी बोलले की, युपीए सरकारच्या काळात अशा लोकांना पाठिंबा मिळाला.
#WATCH S.Swamy speaks on #Padmavati,says,'must see if there is intn'l conspiracy in it, Dubai's ppl want Muslim kings to be shown as heroes' pic.twitter.com/vgwO6EkKj7
— ANI (@ANI) November 10, 2017
दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या गुंतवणुकदारांची सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशी केली पाहिजे अशी मागणी स्वामींनी यावेळी केली.
याआधी भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी चित्रपटाला विरोध करताना सांगितलं की, 'इतिहासासोबत कसल्याही प्रकारची छेडछाड खपवून घेतली जाणार नाही. ज्याप्रकारे पद्मावती महाराणी, हिंदू आणि शेतक-यांचा विनोद केला जात आहे, ते पाहता सरकार आणि प्रशासनाला चुकीचं होतंय याची जाणीव होणं गरजेचं आहे. त्यांनी पद्मावती चित्रपटावर पुर्णपणे बंदी आणली पाहिजे'.
जेव्हा साक्षी महाराज यांना सांगण्यात आलं की चित्रपटसृष्टी याचा विरोध करत आहे तेव्हा ते बोलले की, 'चित्रपटसृष्टीला अस्मिता आणि देशाशी काही देणं घेणं नाही. त्यांना फक्त पैसा हवा आहे. पैशांसाठी ते नग्न होण्यासोबत काहीही करु शकतात'.
गुजरातमध्ये सत्तेत असणा-या भाजपाने राज्यातील विधानसभा निवडणुका होईपर्यंत चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. तर काँग्रेसने जर खरंच चित्रपटात इतिहासासोबत छेडछाड करण्यात आली असेल, तर प्रदर्शित केला जाऊ नये असं म्हटलं आहे.
वाद वाढत असल्याचं पाहून चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांनी गुरुवारी पद्मावतीच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट लिहिली होती. यामध्ये त्यांनी वाद न वाढवण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी लिहिलं होतं की, 'नमस्कार मी संजय लिला भन्साळी आहे आणि तुमच्याशा काहीतरी बोलायचं आहे. मी हा चित्रपट अत्यंत जबाबदारी आणि मेहनतीने बनवला आहे. मी नेहमीच राणी पद्मावती यांच्यापासून प्रभावित झालो असून हा चित्रपट त्यांच्या शूरता आणि बलिदानाला नमन करतो. पण काही अफवांमुळे हा चित्रपट वादाचा मुद्दा ठरला आहे. चित्रपटात राणी पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्यात काही ड्रीम सिक्वेन्स शूट करण्यात आल्याची अफवा आहे. मी आधीच असं काही नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की, चित्रपटात भावना दुखावेल असा कोणताही सीन नाही'.