"भारतावर सर्जिकल स्ट्राइक केल्यास पाकिस्तानचं अस्तित्वच राहणार नाही''
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 05:33 PM2018-10-14T17:33:12+5:302018-10-14T17:36:47+5:30
पाकिस्ताननं सर्जिकल स्ट्राइक केल्यास त्यांचं अस्तित्वत राहणार नाही, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत.
नवी दिल्ली- भारताने पाकच्या हद्दीत घुसून एक जरी हल्ला केला तर आम्ही 10 सर्जिकल स्ट्राईक करू, अशी धमकी पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी दिली होती. त्यालाच आता भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्ताननं सर्जिकल स्ट्राइक केल्यास त्यांचं अस्तित्वत राहणार नाही, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत. त्यांनी पाकिस्तानची तुलना रस्त्यावर मवालीगिरी करणा-या गुंडाशी केली आहे.
पाकिस्तान म्हणजे रस्त्यावर मवालीगिरी करणारा गुंड आहे. जो पोलीस आल्यावर पळून जातो. रस्त्यावरचे गुंडच अशा प्रकारची भाषा बोलू शकतात. आम्ही सर्जिकल स्ट्राइक केलं आहे, तुम्ही करून दाखवा, मग पाहू पाकिस्तानचं अस्तित्व राहतं की नाही, असं स्वामी म्हणाले आहेत. रस्त्यावर फिरणा-या गुंडांसारखी विधानं सध्या पाकिस्तान करत सुटला आहे. पोलीस येत नाहीत, तोपर्यंत पाकिस्तान अशी गुंडांची भाषा करत राहील आणि एकदा पोलीस आले की तो पळून जाईल, अशी उपरोधिक टीका सुब्रमण्यम स्वामींनी पाकिस्तानवर केली आहे. लंडन येथील पाकिस्तानच्या लष्कराच्या एका कार्यक्रमावेळी पत्रकारांसमोर गफूर यांनी भारतावर सर्जिकल स्ट्राइक करू, अशी धमकी दिली होती.
पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाज्वाही या कार्यक्रमाला उपस्थित होते. तो म्हणाला, जे पाकिस्तानवर हल्ला करण्याचे मनसुबे ठेवून आहेत, त्यांनी पाकची ताकदही एकदा पाहावी. 50 दशलक्ष डॉलरचा सीपेक कॉरिडॉर पाक लष्कराच्या सुरक्षेखाली आहे. या प्रकल्पामुळे पाकची आर्थिक ताकद वाढेल, असेही गफूर म्हणाले आहेत. पाकच्या प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यांच्यावर कोणतीही बंधने लादलेली नाहीत, असा खुलासा त्यांनी केला. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी पाकिस्तानमधील वाईटपणापेक्षा चांगल्या विकासकामांवरही लक्ष द्यावे. पाकमध्ये वाईटापेक्षा चांगली कामे जास्त होत आहेत, असेही गफूर म्हणाले होते.