५ हजार कोटींच्या हमीनंतर सुब्रत रॉय यांना जामीन
By admin | Published: June 20, 2015 12:57 AM2015-06-20T00:57:26+5:302015-06-20T02:12:33+5:30
सर्वोच्च न्यायालयाने सहारा प्रमुख सुब्रत रॉय यांना काही अटींवर शुक्रवारी जामीन मंजूर केला आहे.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सहारा प्रमुख सुब्रत रॉय यांना काही अटींवर शुक्रवारी
जामीन मंजूर केला आहे. गेल्या वर्षभरापासून तिहार तुरुंगात कैद सहारा प्रमुख सुब्रत रॉय यांच्या सुटकेसाठी शुक्रवारी ५,००० कोटी रुपयांची रोख रक्कम जमा करण्याचे आणि तेवढीच बँक गॅरंटी देण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, त्यांच्या वकिलांनी एवढी बँक हमी देण्यास असमर्थता दर्शविली आहे.
रॉय हे सध्या येथील तिहार तुरुंगात असून त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी ५,००० कोटी रुपयांची बँक गॅरंटी देणे कठीण असल्याचे न्यायालयाला सांगितले. कारण वित्तीय संस्थांपैकी एका संस्थेने आर्थिक साहाय्य करण्याचे आश्वासन पाळले नाही. दरम्यान, गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी रॉय हे गेल्या वर्षभरापासून तुरुंगात आहेत.
न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर, न्यायमूर्ती ए. आर. दवे आणि न्यायमूर्ती ए. के. सिक्री यांच्या पीठाने आपल्या आदेशात ‘आम्ही बँक हमीचा अर्ज काही अटींसह स्वीकार केला आहे,’ असे म्हटले आहे. न्यायालयाने चार मार्च २०१४ रोजी तिहार तुरुंगात कैद सुब्रत राय यांना भांडवली बाजार नियंत्रक संस्था सेबीकडे १८ महिन्यांत ३६,००० कोटी रुपये भरण्याचे निर्देश दिले होते. ही रक्कम रॉय यांच्या सुटकेच्या तारखेपासून नऊ टप्प्यात भरण्याची मुभा देण्यात आली आहे.