सुब्रतो राय यांना हॉटेल विक्रीसाठी १५ दिवसांची मुदतवाढ
By admin | Published: September 9, 2014 03:37 AM2014-09-09T03:37:56+5:302014-09-09T03:37:56+5:30
सर्वोच्च न्यायालयाने सहारा प्रमुख सुब्रतो राय यांना न्यूयॉर्क आणि लंडन येथील तीन आलिशान हॉटेल विक्रीच्या व्यवहाराला अंतिम रूप देण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सहारा प्रमुख सुब्रतो राय यांना न्यूयॉर्क आणि लंडन येथील तीन आलिशान हॉटेल विक्रीच्या व्यवहाराला अंतिम रूप देण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. राय यांना सेबीकडे १0 हजार कोटी रक्कम जमा करायची आहे. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका होऊ शकणार आहे.
ही मालमत्ता विक्री करण्यासंदर्भात परदेशी खरेदीदारांशी सौदा जवळपास पक्का झाला होता. परंतु आता तो रद्द होण्याच्या उंबरठय़ावर आहे.हे हॉटेल खरेदी करण्यास इच्छुक तीन ते चार इतर परदेशी खरेदीदारांना चर्चा करून सौद्याला अंतिम रूप देण्यासाठी आणखी वेळ हवा आहे, असे राय यांच्या वकिलाने न्यायमूर्ती तिरथसिंग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाला सांगितले. न्यायालयाने संभावित खरेदीदारांशी झालेला समझोता आणि इतर दस्तऐवजाचे अवलोकन केले. त्यानंतर न्यायालयाने सौद्याला अंतिम रूप देण्याचा प्रयत्न झाल्याची टिप्पणी केली आणि यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. या संपत्तीच्या विक्रीला अंतिम रूप देण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्याची विनंती मान्य केली जाते, असा आदेश न्यायाधीशांनी दिला. सर्वोच्च न्यायालयाने राय यांना तिहार कारागृहात राहून संभावित खरेदीदारांशी चर्चा करण्यासाठी १0 दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. राय यांनी न्यूयॉर्कमधील ड्रीम डाऊनटाऊन आणि द प्लाझा तसेच लंडन येथील ग्रासवेनर हाऊस विक्रीसाठी काढले आहे. राय गेल्या सहा महिन्यांपासून तिहार कारागृहात आहेत. सहारा समूहाला सर्वोच्च न्यायालयात कार्यवाही समाप्त करण्यासाठी सुमारे ३७ हजार कोटी रुपयांचा भरणा करावा लागणार आहे. (वृत्तसंस्था)