फळे, भाज्या वाहतूक, साठवणीसाठी सबसिडी; महाराष्ट्रात खाद्यान्न प्रक्रियेची साखळी उभारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 05:58 AM2022-03-21T05:58:20+5:302022-03-21T05:59:26+5:30
शेतकऱ्यांवर कवडीमाेल भावात फळे आणि भाजीपाल्याची विक्री करण्याची वेळ येऊ नये, यासाठी सवलत देण्यात येत आहे.
नितिन अग्रवाल, लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्र सरकारने काेराेना आणि लाॅकडाऊनच्या नावाखाली रेल्वेत ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत बंद केली आहे. मात्र, शेतकऱ्यांना फळे आणि भाजीपाला वाहतुकीसाठी ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. खाद्यान्न पुरावठा मंत्रालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन ग्रीन्स’ अंतर्गत आतापर्यंत १९४ काेटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.
मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांवर कवडीमाेल भावात फळे आणि भाजीपाल्याची विक्री करण्याची वेळ येऊ नये, यासाठी सवलत देण्यात येत आहे. त्यानुसार, बटाटे, टाेमॅटाे, कांदा यासारख्या अधिसूचित भाज्या आणि फळांची वाहतूक आणि साठवणीसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येत आहे. ही याेजना नाेव्हेंबर २०१८ मध्ये सुरू झाली हाेती. त्यानंतर मे २०२० मध्ये याेजनेची व्याप्ती वाढवून आणखी भाज्या आणि फळांचा समावेश अधिसूचित करण्यात आला.
मालवाहतूक आणि साठवणुकीसाठी अनुदानाचा दावा करणारे शेतकरी आणि संस्थांसाठी ऑनलाइन पाेर्टल सुरू करण्यात आले आहे. देशभरात किसान रेल्वेद्वारे २०२१च्या अखेरपर्यंत या याेजनेतून ५.९८ लाख मेट्रिक टन भाजीपाला आणि फळांची वाहतूक करण्यात आली. त्यावर अनुदानापाेटी १९४.३४ काेटी रुपये देण्यात आले. जम्मू आणि काश्मीरमध्ये सफरचंदाची वाहतूक आणि साठवणुकीसाठी नाफेडच्या माध्यमातून ७ काेटी रुपयांचे अनुदान देण्यात आले.
महाराष्ट्रात खाद्यान्न प्रक्रियेची साखळी उभारणार
मजाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये खाद्यान्न प्रक्रियेची साखळी विकसित करण्यासाठी ४० वेअर हाऊस मंजूर करण्यात आले आहेत. त्यांची एकूण क्षमता ४६ हजार ३८० मेट्रिक टन एवढी आहे. त्यासाठी ३६३.३० काेटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून १३६.८२ काेटी रुपयांचे अनुदान देण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.