निकृष्ट दर्जाचे काम; आमदाराने हात मारला अन् कॉलेजची अख्खी भिंत कोसळली; पाहा व्हिडिओ...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 02:37 PM2022-06-24T14:37:25+5:302022-06-24T14:38:17+5:30
या घटनेनंतर आमदार संतापले आणि त्यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना बोलावून संपूर्ण प्रकार सांगितला, तसेच सरकारवर जोरदार टीकाही केली.
प्रतापगड: भ्रष्टाचारातून तयार झालेल्या बांधकामाची गुणवत्ता किती खराब असू शकते, हे उत्तर प्रदेशातील एका घटनेवरुन सिद्ध झाले आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे बांधकाम सुरू असलेल्या सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयाची पाहणी करण्यासाठी आलेले समाजवादी पक्षाचे आमदार आरके वर्मा यांनी बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आमदार आरके वर्मा यांनी स्वत:च्या हाताने भिंत ढकलल्याने संपूर्ण भिंतच कोसळली.
ऐसे घटिया निर्माण कार्य से सरकार युवाओं का भविष्य नहीं तैयार रही,यह उनके मौत का इंतजाम है, रानीगंज विधानसभा में बन रहे इंजीनियरिंग कॉलेज में भ्रष्ट सरकारी तंत्र का दर्शन। pic.twitter.com/Rr6ibkN4l4
— Dr. R. K. Verma mla (@DrRKVermamla2) June 23, 2022
प्रतापगढच्या राणीगंज विधानसभेच्या शिवसात जंगलात बांधल्या जाणाऱ्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची पाहणी करण्यासाठी आलेले सपा आमदार डॉ. आरके वर्मा आले होते. यावेळी त्यांना विटा निघत असल्याचे दिसले. यानंतर त्यांनी एका हातानेच उभ्या भिंतीला धक्का दिला अन् अख्खी भिंतच कोसळली. यावेळी त्यांनी 'महाविद्यालय नाही, तर स्मशानभूमी बनवली जात आहे', अशी टीका केला.
यानंतर सपाचे आरके वर्मा संतापले आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बोलावून संपूर्ण प्रकार सांगितला. यावर ग्रामीण अभियांत्रिकी सेवेच्या अभियंत्यांनी घाईघाईने घटनास्थळ गाठले आणि वर्मा यांच्यासमोर बांधकामाचा नमुना प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करत सपा आमदार आरके वर्मा म्हणाले की, 'अशा निकृष्ट बांधकामामुळे सरकार तरुणांचे भविष्य तयार करत नाही, तर त्यांच्या मृत्यूची व्यवस्था आहे. राणीगंज विधानसभेत बांधल्या जाणाऱ्या इंजिनीअरिंग कॉलेजमधील भ्रष्ट सरकारी यंत्रणेचे दर्शन.