ऊर्जा क्षेत्रात भरीव भागीदारी; भारत-यूएईमध्ये चार करार, युवराज नहयान व मोदींची भेट यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 08:05 AM2024-09-10T08:05:16+5:302024-09-10T08:05:38+5:30
मोदींशी चर्चा केल्यानंतर युवराजांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली
नवी दिल्ली : भारत दौऱ्यावर आलेले अबूधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेत व्यापक चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांनी धोरणात्मक संबंधांना चालना देण्यावर लक्ष केंद्रित करून ऊर्जा सहकार्य वाढविण्यासाठी चार करारांवर स्वाक्षरी केली. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नहयान यांच्यात गाझामधील परिस्थितीसह जागतिक आव्हानांवरही चर्चा झाली.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि युवराज यांच्यात बहुआयामी संबंधांवर चर्चा केली. मोदींशी चर्चा केल्यानंतर युवराजांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली.
चार करार कोणते झाले?
अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी (एडीएनओसी) आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातील दीर्घकालीन एलएनजी पुरवठ्यासाठी करार.
एडीएनओसी आणि इंडिया स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह लिमिटेड (आयएसपीआरएल).
अमिरात न्यूक्लियर एनर्जी कंपनी (ईएनईसी) आणि न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल) मध्ये बाराकाह न्यूक्लियर पॉवर प्लांटच्या ऑपरेशन आणि देखभालीसाठी करार.
अबु धाबी ब्लॉक वनसाठी ऊर्जा भारत आणि एडीएनओसीत उत्पादन सवलत करार.
मोदींच्या २०१५ च्या भेटीनंतर संबंध सुधारले
ऑगस्ट २०१५ मध्ये पंतप्रधान मोदींच्या युएईच्या ऐतिहासिक भेटीनंतर, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणखी वाढले आहेत.
द्विपक्षीय व्यापारासाठी भारतीय रुपया आणि दिरहम (संयुक्त अरब अमिरातीचे चलन) चा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी दोन्ही देशांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये व्यापक आर्थिक भागीदारी करार केले.