‘कोरोना’वरील लस विकसित करण्यात पुण्यातील " या " संस्थेला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 09:51 PM2020-02-18T21:51:19+5:302020-02-18T21:58:16+5:30
पुढील सहा महिन्यात या लसीची मानवी चाचणी सुरू केली जाणार
पुणे : चीनसह जगभरातील विविध देशांमध्ये फैलाव झालेल्या कोरोना विषाणुला रोखणारी लस विकसित करण्यात पुण्यातील सिरम इस्टिट्युट ऑफ इंडियाला यश मिळाले आहे. ही लस विषाणुचे संक्रमण रोखण्यासाठी कमी वेळेत रोगप्रतिकारशक्ती वाढवत असल्याचा दावा संस्थेकडून करण्यात आला आहे. पुढील सहा महिन्यात या लसीची मानवी चाचणी सुरू केली जाणार असून त्यानंतर २०२२ पर्यंत ही लस प्रत्यक्ष तयार होईल.
कोरोना विषाणुची लागण झाल्याने चीनमध्ये आतापर्यंत १८०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास पाऊण लाख नागरिकांना या विषाणुने विळखा घातला आहे. भारतासह जगातील अन्य काही देशांमध्येही कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जगभरातील संस्थांमध्ये यावर संशोधन सुरू आहे. यामध्ये भारताने आघाडी घेतली आहे. सिरम संस्थेतील संशोधकांनी अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी ‘कोडाजेनिक्स’च्या मदतीने ही लस विकसित केली आहे. सध्या प्राथमिक स्तरावर या लसीच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. कमी कालावधीमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवून एकप्रकारचे सुरक्षाकवच तयार करत असल्याचा संस्थेचा दावा आहे.
पुढील आठवड्यापासून उंदीर आणि माकडावर त्याच्या चाचण्या घेतल्या जाणार आहे. त्याचे निष्कर्ष दीड-दोन महिन्यांमध्ये समोर येतील. मानवी चाचण्या घेण्यासाठी अद्याप सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या चाचण्या पुढील वर्षभर सुरू राहू शकतात. या चाचण्यांमध्ये येणाऱ्या निष्कर्षांनुसार लसीवर संशोधन केले जाईल. लसीचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्यासाठी किमान दीड-दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. कारण मानवी चाचणीनंतर या लसीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मंजुरी मिळवावी लागेल. त्यानंतरच उत्पादन सुरू करता येणार आहे.
----------------
लसीच्या प्राथमिक संशोधनासाठी ‘कोडोजेनिक्स’ या अमेरिकन कंपनीशी सिरम संस्थेने करार केला आहे. या कंपनीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनच संशोधन सुरू आहे. त्याआधारे चीनमधील नोवेल कोरोना विषाणुशी साधर्म्य असलेला जेनेटिक विषाणु तयार करण्यात आला. त्यामुळेच एवढ्या कमी कालावधीत लस विकसित करण्यात यश मिळाले आहे. अन्यथा यापुर्वी इतर लसी विकसित करण्यासाठी ६-७ वर्षांचा कालावधी लागला आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच एवढ्या कमी कालावधीत लस विकसित करता आली आहे. - आदर पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी सिरम संस्था.