नारीशक्ती! पतीच्या मृत्यूनंतर 'तिने' घेतली कुटुंबाची जबाबदारी; आज दरमहा 10 लाखांची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 05:15 PM2023-10-19T17:15:29+5:302023-10-19T17:24:52+5:30
पतीच्या निधनानंतर रचना मोहन यांनी स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि आज त्या कागदी पिशव्या बनवत आहेत.
हिंमत असेल तर नशिबालाही हरवता येतं. शाहजहानपूरच्या रहिवासी रचना मोहन यांनी हे सिद्ध करून महिला सक्षमीकरणाचा आदर्श घालून दिला आहे. पतीच्या निधनानंतर रचना मोहन यांनी स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि आज त्या कागदी पिशव्या बनवत आहेत. त्यामुळे त्या आता आपलं कुटुंब चांगल्या प्रकारे सांभाळत आहे. यासोबतच रचना यांनी अनेक लोकांना रोजगारही दिला आहे.
शाहजहांपूरच्या मोहल्ला कृष्णनगर येथील रहिवासी असलेल्या रचना मोहन यांच्या पतीचे 2018 मध्ये आजारपणामुळे निधन झाले. पतीच्या निधनानंतर रचना यांच्यावर उदरनिर्वाहाचे संकट आलं. रचना यांनी आपल्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान स्वयंरोजगार योजनेंतर्गत 25 लाखांचं कर्ज घेतलं.
कर्जातून मिळालेल्या पैशातून 14.5 लाख रुपये किमतीचे कागदी पिशवी बनवण्याचे मशीन खरेदी केले. उरलेल्या पैशातून कच्चा माल घेतला आणि कागदी पिशव्या बनवायला सुरुवात केली. तयार केलेल्या कागदी पिशव्या शाहजहानपूर तसेच आसपासच्या जिल्ह्यात विकण्यास सुरुवात केली आहे.
8 ते 10 लाखांची उलाढाल
रचना सांगतात की, 2022 मध्ये कागदी पिशव्या बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. आता त्याची मासिक उलाढाल 8 ते 10 लाख रुपये आहे. ज्यामध्ये त्यांना जवळपास 10% नफा देखील मिळतो. कागदी पिशवीचे हे काम तिच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी पुरेसे आहे. यासोबतच कागदी पिशव्या बनवण्याचे आणि त्या बाजारात विकण्याचे काम करणाऱ्या अनेक लोकांना त्यांनी रोजगारही दिला आहे.
पतीच्या निधनानंतर त्यांना एकटं वाटलं, पण त्यांनी कधीही हिंमत हारली नाही आणि नेहमीच पुढे जाण्यासाठी धैर्य एकवटलं. आपल्या पायावर उभ्या राहिल्या. आता त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा पुरू मोहनही कागदी पिशवी बनवण्याच्या युनिटचे संपूर्ण काम पाहतो. रचना मोहन सांगतात की, आता ती कागदी पिशव्या बनवण्यासाठी नवीन युनिट सुरू करण्याची तयारी करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.