Success Story: ज्यूस मशीनमध्ये दोन्ही हात गेले, कोपरानं पेपर लिहीला अन् अक्षय बनला वकिल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 04:55 PM2022-07-30T16:55:10+5:302022-07-30T16:56:36+5:30

आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी त्यावर स्वकतृत्वानं मात करता येते याचं एक मूर्तीमंत उदाहरण हिमाचल प्रदेशच्या ऊना जिल्ह्यातील मैडी गावात राहणाऱ्या अक्षयनं दिलं आहे.

success story Both hands went into the juice machine akshay now became a lawyer | Success Story: ज्यूस मशीनमध्ये दोन्ही हात गेले, कोपरानं पेपर लिहीला अन् अक्षय बनला वकिल!

Success Story: ज्यूस मशीनमध्ये दोन्ही हात गेले, कोपरानं पेपर लिहीला अन् अक्षय बनला वकिल!

googlenewsNext

आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी त्यावर स्वकतृत्वानं मात करता येते याचं एक मूर्तीमंत उदाहरण हिमाचल प्रदेशच्या ऊना जिल्ह्यातील मैडी गावात राहणाऱ्या अक्षयनं दिलं आहे. दिव्यांगपणावर मात करुन अक्षयनं स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर एलएलबीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि आज तो वकिल बनला आहे. एका दुर्घटनेत अक्षयला आपले दोन्ही हात गमावावे लागले होते. पण यामुळे खचून न जाता नव्या उमेदीनं अक्षयनं प्रयत्न केले आणि आज त्यानं कोर्टात वकिलीच्या प्रॅक्टीसला सुरुवात केली आहे. 

इयत्ता सातवीत असतानाच अक्षयचे दोन्ही हात ऊसाचा रस काढणाऱ्या मशीनमध्ये गेले होते. २००७ साली अक्षयसोबत ही दुर्घटना घडली होती. अक्षय गंभीररित्या जखमी झाला होता आणि त्याचे दोन्ही हात कोपरापासून कापण्याशिवाय डॉक्टरांपुढे पर्याय नव्हता. सर्वसाधारण कुटुंबाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अक्षयसोबतच त्याच्या आई-वडील आणि भावंडांसाठी हा मोठा धक्का होता. कुटुंबातील हुशार मुलावर अशी वेळ ओढावल्यानं सर्वच धक्क्यात होते. 

कुटुंबीयांना अक्षयच्या भवितव्याची काळजी लागली होती. त्याचवेळी या वेदनादायक अपघातातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या अक्षयच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. दोन्ही हातांच्या जखमा भरल्यानंतर अक्षयने पेन धरण्याचा सराव सुरू केला. पेन दोन्ही कोपरांनी धरून कागदावर लिहिण्याचा प्रयत्न करत चित्रकलेचा सरावही केला. या काळात त्यानं आपला अभ्यास सुरुच ठेवला होता. 

त्याने माडी येथील हायस्कूलमध्ये दहावीची परीक्षा दिली आणि पेपर लिहिण्यासाठी सहायकाची सेवा घेतली, परंतु परीक्षेत त्याला आवश्यक गुण मिळाले नाहीत. याचं मूळ कारण म्हणजे त्याच्या असिस्टंटने लिहिताना खूप चुका केल्या. यामुळे त्याने पुढच्या वर्गात स्वतःहून लिहायचं ठरवलं आणि नायहरियान येथील वरिष्ठ माध्यमिक विद्यालयातून प्लस टू परीक्षा उत्तीर्ण केली. 

यानंतर वकील अक्षय कुमार यानं मागे वळून पाहिलं नाही. त्यानं महाराणा प्रताप महाविद्यालय, अंब येथे बी.ए.ला प्रवेश घेतला आणि बी.ए.ची परीक्षा ७९ टक्के गुणांसह उत्तीर्ण केली. यानंतर त्यानं एलएलबी करण्याचा निर्णय घेतला आणि हरोली येथील बधेडा येथील हिम कॅप्स लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि मेहनतीच्या जोरावर परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केली. आता अक्षयने वकिलीचे काम सुरू केले आहे. 

आपले दोन्ही हात गमावलेला अक्षय कुमार आपल्या दिनक्रमातही इतरांवर अवलंबून नसायचा. कपडे बदलण्यापासून ते अंघोळ, धुणी, पाणी भरणं ही कामं तो स्वतः करतो. याशिवाय घरातील लहान-मोठी कामे करून तो कुटुंबातील सदस्यांना मदतही करतो.

"माझ्यासारख्या हजारो लोकांना एका किंवा दुसर्‍या अपघातात हातपाय गमावून दिव्यांग होऊन जीवन जगावं लागत आहे. पण अशा लोकांनी आयुष्यात हार मानू नये, तर सतत धडपड करून स्वावलंबन आणि स्वाभिमानानं जगण्याची कला आत्मसात केली पाहिजे", असं अभिमानानं अक्षय आज सांगतो. 

Web Title: success story Both hands went into the juice machine akshay now became a lawyer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.