भारीच! परिस्थिती बिकट, दहावीनंतर शाळा सोडली; कापड गिरणीत करायचा काम, आता होणार डॉक्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 01:01 PM2023-06-15T13:01:48+5:302023-06-15T13:08:45+5:30
छोट्याशा गावातील या तरुणाने कमाल केली आहे.
परिस्थिती माणसाला पुढे जाण्यापासून कधीच रोखू शकत नाही. NEET परीक्षेत निवड झालेल्या सूर्य प्रकाशने हे सत्य सिद्ध केलं आहे. सूर्य प्रकाशचे वडील आणि आजोबा हे मतिमंद आहेत. घरची परिस्थिती चांगली नाही. आई पशुपालन करून घर चालवते. घरची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सूर्य प्रकाशने अकरावीत विज्ञान विषय निवडला नाही. सूर्य प्रकाश याने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, 'मी विज्ञान विषयात नेहमीच टॉप स्कोअर करत आलो आहे, पण मी मेडिकल किंवा इंजिनीअरिंगच्या प्रवेश परीक्षेत बसण्याचा विचार कधीच केला नाही. पण काही लोकांनी समजावले, त्यानंतर NEET परीक्षा दिली आणि आता ऑल इंडिया रँकिंग आली आहे.
राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील नौकाडा या छोट्याशा गावातील या तरुणाने कमाल केली आहे. सूर्य प्रकाशने OBC श्रेणीमध्ये AIR 892 रँक मिळवला. मोठी गोष्ट म्हणजे त्याचं शिक्षण सरकारी महाविद्यालयातून पूर्ण व्हायला हवं यासाठी आता ग्रामस्थ एकवटले आहेत. मंगळवारी या तरुणाच्या यशानंतर गावकऱ्यांनी त्याला हार घालत त्याचा सत्कार केला आणि यावेळी त्याच्या आनंदात सहभागी झालेल्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. सूर्य प्रकाशची मेहनत आणि समर्पण पाहून गावकऱ्यांनी त्याच्या वैद्यकीय शिक्षणासाठी निधी उभारण्याचे आश्वासन दिले.
दिवसाला 500 रुपये कमवतो
सूर्य प्रकाशने 10वी नंतर नॉर्मल शिक्षण सोडलं होते. तो अहमदाबाद येथील कापड गिरणीत कामाला गेला होता. NEET निकालाच्या एक दिवस आधीही, सूर्य प्रकाश अहमदाबादच्या मिलमध्ये दिवसाचे 10 तास मजूर म्हणून काम करत होता आणि दिवसाला 500 रुपये कमवत होता. प्रकाशने दहावीपर्यंत गावातील सरकारी शाळेत शिक्षण घेतले, मात्र गरिबी आणि कौटुंबिक परिस्थितीमुळे त्याला मोठी स्वप्ने पाहता आली नाहीत, मात्र आता लोक त्याच्या मदतीसाठी पुढे आले आहेत आणि लवकरच तो सूर्य प्रकाश शासकीय महाविद्यालयातून पदवीधर होणार आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो डॉक्टर म्हणून देशाची सेवा करेल.
शिक्षकांच्या मदतीने कोचिंग संस्थेत घेतला प्रवेश
मिळालेल्या माहितीनुसार, सूर्य प्रकाश याच्या कुटुंबीयांना दररोज दोन वेळचे जेवणही मिळत नव्हते. त्याचं कुटुंब दोन-तीन वर्षांपूर्वीपर्यंत एका मातीच्या घरात राहत होते. यानंतर राज्य सरकारच्या योजनांतर्गत आर्थिक मदत मिळाली आणि पंतप्रधान आवास योजनेंतर्गत दोन खोल्यांचे घरही मिळाले. वयाच्या 13 वर्षी सूर्य प्रकाशने दुकानं आणि शेतात मदतनीस म्हणून काम करायला सुरुवात केली आणि अकरावीत असताना अहमदाबादच्या कापड गिरणीत रुजू झाला. मात्र सूर्य प्रकाश याची मेहनत पाहून शाळेतील शिक्षकांनी प्रयत्न केले. त्याच्या ग्रामस्थ सेवा संस्थेच्या मोफत प्रशिक्षण योजनेंतर्गत, त्याला कोचिंग संस्थेत प्रवेश मिळाला आणि आता त्याने चांगले गुण मिळवून NEET मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.