कडक सॅल्यूट! 35 परीक्षांमध्ये नापास, हार नाही मानली; 2018 मध्ये IPS झाले, नंतर IAS अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 09:01 AM2023-05-18T09:01:33+5:302023-05-18T09:09:05+5:30
हरियाणा पीसीएस, यूपी पीसीएस, एसएससी सीजीएल सारख्या 30 हून अधिक स्पर्धात्मक परीक्षा दिल्या. पण एकातही यश आले नाही.
आयुष्यात एक-दोन अपयश आल्यावर लोकं त्यासमोर हार मानतात. त्यांच्या नशिबाला जबाबदार धरून ते पुढे प्रयत्न करण्यास नकार देतात. पण आयएएस विजय वर्धन अशी व्यक्ती आहे जी स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक वेळा नापास झाली, तरीही त्यांनी हार मानली नाही. शेवटी UPSC क्रॅक केली. छोट्या-छोट्या अडचणी सोडणाऱ्यांनी हरियाणाच्या आयएएस विजय वर्धन यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे.
आयएएस विजय वर्धन हे हरियाणातील सिरसा येथील रहिवासी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण सिरसा येथूनच झाले. यानंतर त्यांनी हिसार येथून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये बीटेक केले. B.Tech नंतर विजय वर्धन यांनी नागरी सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला. पण ते अजिबात सोपं नव्हतं. इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर विजय वर्धन UPSC ची तयारी करण्यासाठी दिल्लीत आले.
तयारी दरम्यान, त्यांनी हरियाणा पीसीएस, यूपी पीसीएस, एसएससी सीजीएल सारख्या 30 हून अधिक स्पर्धात्मक परीक्षा दिल्या. पण एकातही यश आले नाही. यामुळे ते नक्कीच निराश झाले होते पण त्यांनी हार मानली नाही. विजय वर्धन यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली. पण अपयशाने त्यांची साथ सोडली नाही. एकापाठोपाठ चार प्रयत्न केले. चारही वेळा अपयशाचा सामना करावा लागला.
अपयशाची मालिका पाहून त्यांच्या जवळच्या मित्रांनी आशा सोडली होती, पण विजय यांचा विश्वास डगमगला नाही. अखेर 2018 मध्ये त्यांच्या मेहनतीला फळ मिळाले. ते 104 रँकसह UPSC उत्तीर्ण करण्यात यशस्वी झाले. अशा प्रकारे ते आयपीएस झाले. विजय वर्धन हे केवळ आयपीएस पदावरच समाधानी नव्हते. त्यांच्या उणिवांवर लक्ष केंद्रित करून त्यांनी पुन्हा एकदा यूपीएससीची परीक्षा दिली आणि 2021 मध्ये ते आयएएस झाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.