कधी टेम्पो चालवला तर कधी भिकाऱ्यांसोबत झोपला; 12वी नापास मुलगा 'असा' IPS अधिकारी झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 12:21 PM2022-11-28T12:21:16+5:302022-11-28T12:28:00+5:30
मनोज कुमार हे बारावी नापास झाले होते. इयत्ता नववी आणि दहावीमध्ये कसेबसे उत्तीर्ण झाले.
IPS मनोज कुमार शर्मा हे मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. लहानपणापासूनच ते अभ्यासात हुशार नव्हते. आर्थिक परिस्थितीशी झगडणाऱ्या कुटुंबात त्यांचं पालनपोषणही झालं. देशातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षा, UPSC परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी जिद्दीने करून दाखवलं आहे. मनोज कुमार शर्मा यांचा हा प्रवास सोपा नव्हता. एखाद्या चित्रपटाप्रमाणे त्यांच्या आयुष्यात चढ- उतार आले. पण त्यांनी धीराने या परिस्थितीशी सामना केला. विशेष म्हणजे आता त्यांच्या आयुष्यावर लवकरच चित्रपट देखील येणार आहे.
मनोज कुमार हे बारावी नापास झाले होते. इयत्ता नववी आणि दहावीमध्ये कसेबसे उत्तीर्ण झाले. बारावीत फक्त हिंदी या एकाच विषयात पास झाले होते. मात्र तरी देखील त्यांनी जीद्द सोडली नाही. प्रेमामुळेच माझ्यावर नापास होण्याची वेळ आली. मात्र त्यानंतर प्रेमामुळे मी माझं ध्येय गाठू शकलो, मी आयपीएस परीक्षा पास झालो असं मनोज कुमार यांनी म्हटलं आहे. प्रेयसीने लग्नासाठी तशी अटच घातली होती. त्यामुळे प्रचंड मेहनत करून आयपीएस परीक्षेत त्यांनी यश मिळवलं.
मनोज यांना अत्यंत कठिण परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यांनी काही काळ टेम्पो देखील चालवला. त्यांना रात्री झोपण्यासाठी जागा देखील मिळत नसे. त्यामुळे भिकाऱ्यांसोबत झोपण्याची त्यांच्यावर वेळ आली. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील एका वाचनालयात काम सुरू केलं. या काळात त्यांचा पुस्तकांशी जवळून संबंध आला. त्यांचा य़ेथेच मॅक्सिम गार्की, अब्राहन लिंकन यांच्या विचारांशी परिचय झाला. पुढे हेच त्यांना अत्यंत फायद्याचं ठरलं.
मनोज कुमार शर्मा UPSC परीक्षेत तीन वेळा नापास झाले होते. त्यानंतर चौथ्या प्रयत्नात 121 वा क्रमांक मिळवून तो आयपीएस अधिकारी झाले. मनोज शर्मा हे सध्या मुंबई पोलीस दलात अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या जीवनातील संघर्ष कोणालाही अपयशातून शिकून पुढे जाण्याची प्रेरणा देतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"