कष्टाचं फळ! सरकारी शाळेत शिक्षण, शेतात केलं काम; जुळ्या मुलांची आई झाली IPS अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 12:21 PM2023-02-21T12:21:22+5:302023-02-21T12:21:54+5:30
IPS Saroj Kumari : एक काळ असा होता जेव्हा त्यांना फक्त छोट्या मोठ्या सुखासाठीच नव्हे तर मूलभूत सुविधांसाठीही ध़़डपड करावी लागत होती.
राजस्थानमधील एका छोट्या गावात जन्मलेल्या सरोज कुमारी आज देशाच्या प्रसिद्ध आयपीएस अधिकारी आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा त्यांना फक्त छोट्या मोठ्या सुखासाठीच नव्हे तर मूलभूत सुविधांसाठीही ध़़डपड करावी लागत होती. गुजरातच्या वडोदरा येथील डीसीपी सरोज कुमारी यांनी बालपणात अनेक अडचणींचा सामना केला. सरकारी शाळेत शिकण्यापासून ते आयपीएस अधिकारी होण्यापर्यंत त्यांनी आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत केली आहे. जुळ्या मुलांची आई असलेल्या IPS सरोज कुमारी यांची यशोगाथा जाणून घ्या.
सरोज कुमारी यांचा जन्म राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील चिरावा उपविभागातील बुडानिया गावात बनवारीलाल मेघवाल आणि सेवा देवी यांच्या घरी झाला. बनवारीलाल हे सैन्यातून निवृत्त झाले होते पण त्यांची पेन्शन कमी होती. घर चालवण्यासाठी सरोज कुटुंबासमवेत शेतीत मदत करायच्या. सरोज यांनी गावातील सरकारी शाळेतून आठवीपर्यंत शिक्षण घेतले होते. त्यांच्या गावात पुढील शिक्षण शक्य नव्हते. त्यामुळेच त्यांनी अलीपूर गावातल्या सरकारी शाळेत प्रवेश घेतला.
ही शाळा त्यांच्या गावापासून 6 किमी अंतरावर होती. तिथपर्यंत पोहोचण्याचे साधन नव्हते. त्यामुळे सरोज शाळेत जाण्यासाठी रोज सहा किमी चालत असे. एवढ्या संघर्षातही त्या 12वी बोर्डाच्या परीक्षेत अव्वल ठरल्या. सरोज यांना अभ्यासात खूप रस होता. 12वी टॉपर झाल्यानंतर त्यांनी जयपूरच्या महाराणी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथून शिक्षण घेतल्यानंतर त्या लेक्चरर झाल्या पण आता त्यांना नागरी सेवांमध्ये रस होता. त्यांनी यामध्ये देखील घवघवीत यश संपादन केले.
IPS सरोज कुमारी यांनी 2019 मध्ये डॉ. मनीष सैनी यांच्याशी विवाह केला. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी जुळी मुले आहेत. सरोज यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यात त्या पारंपारिक वेशभूषेत दिसल्या होत्या. त्याचे ते फोटो पाहून त्या आयपीएस अधिकारी आहे, यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"