कोव्हॅक्सिनच्या प्राणी चाचण्या यशस्वी, लसीने मजबूत प्रतिकार शक्ती विकसित केल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 12:26 AM2020-09-13T00:26:40+5:302020-09-13T07:17:30+5:30
कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही लस देण्यात आलेल्या प्राण्यांत मजबूत प्रतिकार शक्ती निर्माण झाली असल्याचे आढळून आले आहे.
नवी दिल्ली : तेलंगणास्थित भारत बायोटेक इंडिया लिमिटेड (बीबीएल) या कंपनीने विकसित केलेल्या कोरोना विरोधातील कोव्हॅक्सिन लसीच्या प्राण्यांवरील चाचण्या प्रचंड यशस्वी झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. या लसीने मजबूत प्रतिकार शक्ती विकसित केल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही लस देण्यात आलेल्या प्राण्यांत मजबूत प्रतिकार शक्ती निर्माण झाली असल्याचे आढळून आले आहे. लस दिलेल्या प्राण्यांना सार्स-कोव-२ विषाणूंच्या संपर्कात ठेवले गेले. तथापि, त्यांना लागण झाल्याचे आढळून आले नाही. भारत बायोटेकने म्हटले की, ही लस २० ºिहसस माकडांना देण्यात आली होती. सार्स-कोव्ह-२ चे अकार्यरत विषाणूंपासून बनविलेल्या लसीचे प्रत्येकी २ डोस या माकडांना देण्यात आले. पहिल्या डोसनंतर १४ व्या दिवशी दुसरा डोस देण्यात आला. त्यानंतर माकडांना विषाणूंच्या संपर्कात आणले गेले. नंतर त्यांच्या नाकाची पोकळी, घसा आणि फुफ्फुसाच्या उतींची तपासणी केली. त्यांच्यात विषाणूंच्या पुनरावृत्तीचे प्रमाण अत्यल्प आढळले.
कोव्हॅक्सिन म्हणजे काय?
कोव्हॅक्सिन ही अकार्यरत (इनअॅक्टिव्ह) लस आहे. यात कोविड-१९ चे मृत विषाणूंचे कण वापरले जातात. मृत असल्यामुळे त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. मात्र, शरीर त्याला प्रतिकार करून अँटिबॉडीज तयार करते.