पोलिसांनी अटकेसाठी ज्यांच्या घराचा दरवाजा तोडलेला, तेच रेवंत रेड्डी आज झाले CM!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 04:07 PM2023-12-07T16:07:11+5:302023-12-07T16:17:09+5:30
तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं मोठं यश मिळवलं.
तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं मोठं यश मिळवलं, याआधी केसीआर सरकाच्या काळात काँग्रेस विरोधी पक्षही नव्हता. तेलंगणात प्रमुख विरोधी पक्ष हा भाजप होता. पण या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत सरकार स्थापन केले. काँग्रेसच्या या यशाच्या मागे सर्वात मोठं नाव आहे ते म्हणजे रेवंत रेड्डी यांचं. रेवंत रेड्डी यांच्याकडे २०२१ मध्ये प्रदेशाध्यक्षपद मिळाले, यानंतर त्यांनी दोन वर्ष फक्त पक्षासाठीच काम करणार असल्याचे सांगितले होते. पुढ त्यांनी राज्यातील अनेक मुद्द्यावर आवाज उठवत सरकारविरोधात आंदोलन केली, खरतर यानंतर ते जनतेसमोर प्रसिद्ध झाले.
रेवंत रेड्डी, तुमचं अभिनंदन आणि मी आश्वस्त करतो की...; पंतप्रधान मोदींनी दिला शब्द!
आज रेवंत रेड्डी यांनी तेलंगणा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेसचा कार्यकर्ता, प्रदेशाध्यक्ष ते तेलंगणाचे मुख्यमंत्र्यांपर्यंतचा त्यांचा प्रवास मोठा आहे. या काळात त्यांना तुरुंगातही जावे लागले.
रेवंत रेड्डी यांनी राज्यभरात लोकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांनी लोकांचे प्रश्न समजावून घेतले. त्यावेळीच त्यांनी कार्यकर्त्यांना सांगतिलं होतं की, सर्वसामान्यांचा आवाज आपण बनलो तर आपण २०२३ मध्ये सत्तेत येऊ शकतो. झालंही तसंच काँग्रेसने ६४ जागा मिळवत सत्ता स्थापन केली. बीआरएस सरकारच्या विरोधात वेगवेगळ्या मुद्द्यावरुन आंदोलन करताना रेड्डी यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले, एकवेळ अशी होती की पोलिसांनी त्यांना घराचा दरवाजा तोडून ताब्यात घेतले होते.
बीआरएस सरकारकडून रेवंत यांना सतत त्रास दिला. त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल केले. एबीव्हीपी नेता म्हणून सुरुवात केलेल्या रेवंत यांनी २०१७ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी टीडीपीमध्ये बराच काळ घालवला. ते काँग्रेसमध्ये येऊन फक्त ६ वर्ष झाले आहेत. २०२१ मध्ये त्यांची तेलंगणा प्रमुख म्हणून निवड केली, तेव्हा काँग्रेसमधील फार कमी लोकांना त्यांच्याबद्दल नीट माहिती होती.
बीआरएस सरकारने रेवंत रेड्डी यांनाही तुरुंगात पाठवले
बीआरएस सरकारने रेवंत यांच्यावर अनेक गुन्हे दाखल केले. त्यांना अटक करण्यात आली. तुरुंगातही पाठवले होते. यापैकी पहिली कारवाई डिसेंबर २०१८ मध्ये घडली, जेव्हा KCR यांना त्यांच्या कोडंगल भेटीच्या निषेधाच्या आवाहनानंतर मूळ कोडंगल येथील त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता.
सात वेळा नजरकैद
मार्च २०२० मध्ये, KCR यांचा मुलगा आणि BRS कार्याध्यक्ष केटी रामाराव यांच्या कथितपणे बेकायदेशीरपणे बांधलेल्या फार्महाऊसवर ड्रोन उडवून अनोखा निषेध करण्यासाठी त्यांनी १४ दिवस न्यायालयीन कोठडीत घालवले. डिसेंबर २०२० ते मार्च २०२३ या कालावधीत रेवंतची प्रतिमा सतत उंचावत असतानाही, त्यांना सात वेळा नजरकैदेत ठेवण्यात आले. भ्रष्टाचाराचा मुद्दा असो की शेतकऱ्यांचा मुद्दा असो, जमिनी हडपण्याचा मुद्दा असो, तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न असो, आंदोलन करायचे तेव्हा त्यांना पोलीस घरीच रोखायचे. या आंदोलनामुळेच रेवंत रेड्डी यांची तेलंगणात प्रसिद्धी वाढत गेली. आज रेवंत रेड्डी यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.