‘आयआरएनएसएस-१ डी’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
By admin | Published: March 29, 2015 01:25 AM2015-03-29T01:25:14+5:302015-03-29T01:25:14+5:30
‘आयआरएनएसएस-१ डी’ या भारताच्या चौथ्या नौकानयन उपग्रहाचे शनिवारी ‘पीएसएलव्ही सी-२७’ या धृवीय प्रक्षेपण यानाद्वारे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
श्रीहरीकोटा : ‘आयआरएनएसएस-१ डी’ या भारताच्या चौथ्या नौकानयन उपग्रहाचे शनिवारी ‘पीएसएलव्ही सी-२७’ या धृवीय प्रक्षेपण यानाद्वारे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. प्रक्षेपणाच्या काही मिनिटातच हा उपग्रह भूस्थिर कक्षेत स्थापित करण्यात शास्त्रज्ञांना यश आले. या उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे भारत आता स्वत:ची नौकानयन प्रणाली (इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम) सुरू करण्यास सज्ज झाला आहे.
५९.५ तास चाललेल्या उलटगणतीनंतर भारतीय अंतराळ संस्थेने (इस्रो) आपल्या सर्वांत विश्वासार्ह अशा ‘पीएसएलव्ही सी-२७’ या प्रक्षेपण यानाद्वारे १४२५ किलो वजनाचा चौथा नौकानयन उपग्रह शनिवारी पहाटे ५.१९ वाजता सतीश धवन अंतराळ केंद्राच्या द्वितीय लाँच पॅडवरून यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला आणि प्रक्षेपणाच्या २१ मिनिटाने हा उपग्रह भूस्थिर कक्षेत स्थापितही करण्यात आला. ‘मिशन यशस्वी ठरले आहे आणि उपग्रह भूस्थिर कक्षेत स्थापित झाला आहे,’ अशी प्रतिक्रया इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांनी व्यक्त केली. किरण कुमार यांनी इस्रोचे अध्यक्षपद सांभाळल्यानंतरचे हे त्यांचे पहिलेच मिशन होते. ‘आयआरएनएसएस-१ डी’ उपग्रह यशस्वीरीत्या अंतराळात नेणाऱ्या पीएसएलव्हीचीही ही २८ वी अंतराळ वारी होती. (वृत्तसंस्था)