मेंदूतून काढला तब्बल क्रिकेटच्या चेंडूएवढा 'ब्लॅक फंगस', ३ तास चालली शस्त्रक्रिया!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 05:52 PM2021-06-12T17:52:20+5:302021-06-12T17:52:47+5:30
कोरोनानंतर आता देशात ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस) म्हणजेच काळ्या बुरशीच्या आजारानं हाहाकार केला आहे.
कोरोनानंतर आता देशात ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस) म्हणजेच काळ्या बुरशीच्या आजारानं हाहाकार केला आहे. बिहारमध्ये तर काळ्या बुरशीच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस लक्षणीयरित्या वाढ होताना दिसत आहे. अशातच बिहारची राजधानी पाटणा येथील आयजीआयएमएस रुग्णालयात काळ्या बुरशीवरील एका शस्त्रक्रियेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
'आयजीआयएमएस'च्या डॉक्टरांनी एका ६० वर्षीय रुग्णावर काळ्या बुरशी काढून टाकण्याची यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. महत्वाची बाब म्हणजे या रुग्णाच्या मेंदूतून तब्बल एका क्रिकेटच्या चेंडूच्या आकाराची काळी बुरशी डॉक्टरांनी काढून टाकली आहे. तब्बल ३ तासांहून अधिक वेळ ही शस्त्रक्रिया सुरू होती. आयजीआयएमएसमध्ये आजवर अनेक काळ्या बुरशीच्या रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. पण एवढी मोठी आणि महत्वपूर्ण शस्त्रक्रिया डॉक्टरांनी मोठ्या शर्थीनं पूर्ण केली आहे.
संबंधित रुग्णाच्या मेंदूत काळ्या बुरशीचा प्रसार झाला होता. त्यात रुग्णाचा दृष्टीवर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेऊन शस्त्रक्रिया करण्याचं आव्हान डॉक्टरांसमोर होतं. मेंदुत काळी बुरशी बळावल्यानं रुग्णांना सारखी चक्कर येत होती आणि तो बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल झाला होता. डॉक्टरांनी मोठे प्रयत्न करुन क्रिकेटच्या चेंडूच्या आकाराची काळी बुरशी आणि १०० एमएलपेक्षा अधिक पल्स रुग्णाच्या मेंदुतून बाहेर काढला आहे. डॉक्टरांनी संबंधित रुग्ण आता धोक्याबाहेर असल्याचं सांगितलं आहे.
शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरांच्या टीमच्या म्हणण्यानुसार ही शस्त्रक्रिया खूप गुंतागुंतीची होती. कारण मेंदुत काळ्या बुरशीचं जाळं पसरलं होतं. आयजीआयएमएसचे चिकित्सा अधिक्षक डॉ. मनीष मंडल यांनी सांगितलं की, "जमुई येथे राहणाऱ्या ६० वर्षीय अनिल कुमार यांना सारखी चक्कर येत होती. त्यात ते वारंवार बेशुद्धावस्थेत जात होते. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होत होती. काळ्या बुरशीचा आजार झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. न्यूरो सर्जन डॉ. ब्रजेश कुमार आणि त्यांच्या पथकानं ही यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे"