अग्नी-१ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
By Admin | Published: November 28, 2015 12:08 AM2015-11-28T00:08:12+5:302015-11-28T00:08:12+5:30
पृथ्वी-२ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची गुरुवारी यशस्वी चाचणी घेतल्यानंतर भारताने शुक्रवारी आपल्या अग्नी-१ या दुसऱ्या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
बालासोर : पृथ्वी-२ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची गुरुवारी यशस्वी चाचणी घेतल्यानंतर भारताने शुक्रवारी आपल्या अग्नी-१ या दुसऱ्या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
संपूर्ण देशी बनावटीच्या अग्नी-१ मध्ये ७०० कि.मी.वरील लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे. सामरिक दले कमान (एसएफसी) प्रशिक्षण कवायतींचा एक भाग म्हणून अग्नी-१ चे ओडिशाच्या बालासोर येथील अब्दुल कलाम बेटावरील इंटेग्रेटेड टेस्ट रेंजच्या लाँच पॅड-४ वरून दुपारी १.०२ वाजता मोबाईल लाँचरद्वारे प्रक्षेपण करण्यात आले.
१२ टन वजनी आणि १५ मीटर लांबीचे अग्नी-१ किमान १ टनाहून जास्त अण्वस्त्रे वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आले आहे; परंतु अण्वस्त्राचे वजन कमी करून या क्षेपणास्त्राचा मारा करण्याचा पल्ला वाढविला जाऊ शकतो.
याआधी अग्नी-१ ची ११ सप्टेंबर २०१४ रोजी चाचणी घेण्यात आली होती. (वृत्तसंस्था)
जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे अग्नी-१ क्षेपणास्त्र घन प्रोपेलन्टस्ने संचालित केले जाते. या क्षेपणास्त्राने आपले लक्ष्य अचूकपणे भेदल्याची माहिती संरक्षण खात्याच्या सूत्रांनी दिली. प्रगत नौकावहन प्रणालीने सज्ज असलेले अग्नी-१ क्षेपणास्त्र याआधीच सशस्त्र दलांत सामील करण्यात आले होते.