चीन-पाकिस्तानवर अचूक वार करणाऱ्या 'अग्नि-2' मिसाइलची चाचणी यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 01:11 PM2018-02-20T13:11:24+5:302018-02-20T13:14:05+5:30
भारताने मंगळवारी मध्यम पल्ल्याच्या अणवस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या अग्नि-2 क्षेपणास्त्राची घेतलेली चाचाणी यशस्वी ठरली.
नवी दिल्ली - भारताने मंगळवारी मध्यम पल्ल्याच्या अणवस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या अग्नि-2 क्षेपणास्त्राची घेतलेली चाचाणी यशस्वी ठरली. ओदिशाच्या तटावरील अब्दुल कलाम बेटावर ही चाचणी घेण्यात आली. सकाळी 8.38 च्या सुमारास मोबाइल लाँचरवरुन जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली.
आयआरबीएम श्रेणीतील या क्षेपणास्त्राचा सैन्य दलात समावेश करण्यात आला असून आज आर्मीच्या स्ट्रॅटजिक फोर्सेस कमांडने चाचणी घेतली. डीआरडीओने या चाचणीसाठी सहकार्य केले. 20 मीटर लांबीच्या अग्नि-2 बॅलेस्टिक मिसाइलमध्ये 1 हजार किलोचे पेलोड वाहून नेण्याची क्षमता आहे. या क्षेपणास्त्राचा पल्ला 2 हजार किलोमीटरचा आहे.
अग्नि दोन टू स्टेज मिसाइल असून त्यात अत्याधुनिक नॅव्हीगेशन सिस्टीम (दिशादर्शन) आहे. या चाचणीसाठी बंगालच्या सागरात नौदलाची दोन जहाजे तैनात करण्यात आली होती. रडारच्या माध्यमातून या संपूर्ण चाचणीचे नियंत्रण करण्यात आले. भारताकडे अग्नि मालिकेतील पाच क्षेपणास्त्रे आहेत. अग्नि-1 ची 700 किलोमीटर, अग्नि-तीनची 3 हजार किलोमीटर, अग्नि-4 आणि पाचची पाच हजार किलोमीटरपर्यंत मारक क्षमता आहे. संपूर्ण चीन आणि पाकिस्तान अग्नि चार आणि पाचच्या टप्प्यात येतो.