पृथ्वी-२ ची यशस्वी चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2016 04:37 AM2016-05-19T04:37:01+5:302016-05-19T04:37:01+5:30
अण्वस्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या पृथ्वी-२ या स्वदेशनिर्मित क्षेपणास्राची चाचणी यशस्वीरीत्या पार पडली.
बालासोर : लष्कराच्या वापरासाठी केल्या जाणाऱ्या परीक्षणाचा भाग म्हणून बुधवारी ओडिशाच्या चांदीपूर येथील एकात्म क्षेत्रात (आयटीआर) अण्वस्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या पृथ्वी-२ या स्वदेशनिर्मित क्षेपणास्राची चाचणी यशस्वीरीत्या पार पडली.
सकाळी ९.४० वाजतादरम्यान आयटीआरमधील संकुल-३ मध्ये मोबाइल लाँचरवर पृथ्वी-२ हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्र ठेवून चाचणी पार पाडण्यात आल्याचे संरक्षण सूत्रांनी सांगितले. पहिली चाचणी यशस्वी पार पडताच लागोपाठ दुसरी चाचणी घेण्याची योजना तांत्रिक अडचणींमुळे सोडून द्यावी लागली. यापूर्वी चांदीपूर येथेच १२ आॅक्टोबर २००९ रोजी अशाच स्वरूपाच्या दोन्ही चाचण्या यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या होत्या. (वृत्तसंस्था)
>काय आहेत वैशिष्ट्ये?
उंची- ९ मीटर, टप्पा एकच
मारा करण्याची क्षमता- ३५० किमी.
अस्र क्षमता- ५०० ते १००० किलो.
इंजिन- दोन, द्रवरूप इंधन.
अत्याधुनिक यंत्रणा- अंतर्गत मार्गदर्शक प्रणालीमुळे अचूक वेध.
(२००३ मध्ये सशस्त्र दलात समावेश. डीआरडीओकडून विकसित केले गेलेले पहिले क्षेपणास्त्र.)