इस्रोला मोठे यश, अंतराळ अपघातात प्राण वाचवू शकणाऱ्या कॅप्सूलची केली यशस्वी चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 06:03 PM2018-07-05T18:03:22+5:302018-07-05T18:12:44+5:30
उपग्रह आणि अंतराळ संशोधनामध्ये जागतिक पातळीवरील आघाडीची संस्था बनलेल्या इस्त्रोने अंतराळ संशोधनामध्ये मोठे यश मिळवले आहे.
नवी दिल्ली - उपग्रह आणि अंतराळ संशोधनामध्ये जागतिक पातळीवरील आघाडीची संस्था बनलेल्या इस्त्रोने अंतराळ संशोधनामध्ये मोठे यश मिळवले आहे. अंतराळ प्रवासात अंतराळवीरांची सुरक्षितपणे ने आण करू शकणाऱ्या कॅप्सुलची इस्त्रोने यशस्वीरीत्या चाचणी केली आहे. ही कॅप्सूल अंतराळवीर आपल्यासोबत अवकाशात नेऊ शकतील. तसेच अंतरकाळात आणीबाणीच्या प्रसंगी तिचा वापर करता येईल.
श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या तळावरून या कॅप्सुलचे यशस्वी परीक्षण करण्यात आले. अंराळ प्रवासादरम्यान झालेल्या कुठल्याही दुर्घटनेत या कॅप्सुलचा वापर करून अंतराळवीर आपले प्राण वाचवू शकतील. या चाचणी संदर्भात माहिती देताना इस्रोचे चेअरमन के. सिवान म्हणाले, क्रू बेलआऊट सिस्टिमवर कॅप्सुलची चाचणी घेण्यात आली. तसेच ही चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली आहे. या चाचणीदरम्यान व्यक्तीऐवजी क्रू मॉडेलचा वापर करण्यात आला. हे मॉडेल कॅप्सुलमध्ये अॅटॅच करण्यात आले होते. तसेच ही कॅप्सुल रॉकेलच्या इंजिनाला जोडून अंतराळात पाठवण्यात आली होती. त्यानंतर काही वेळाने ही कॅप्सुल सुरक्षितपणे समुद्रात निर्धारित करण्यात आलेल्या ठिकाणी उतरली.
259 सेकंद चाललेल्या या चाचणीमध्ये सर्व बाबी यशस्वी आणि ठरवल्याप्रमाणे झाल्या. अंतराळ यानात अंतराळवीरांसोबत जर काही अपघात झाला. तर त्यात अंतराळवीरांची सुरक्षितता निश्चित करणे हा ही कॅप्सुल विकसित करण्यामागचा उद्देश असल्याचे सिवाना यांनी सांगितले.
मानवाला अंतराळात पाठवण्याच्या कार्यक्रमाबाबत सिवान म्हणाले, जर आम्ही अंतराळवीरांना अंतराळात पाठवले तर त्यांना सुरक्षितपणे परत पृथ्वीवर आणण्यास आमचे प्राधान्य असणार आहे. त्यासाठी आम्हाला या अंतराळवीरांसाठी जीवरक्षक प्रणाली विकसित करावी लागेल. ऑक्सिजनची पूर्तता, हवेचा नियंत्रित दाब, मलनिसा:रण सुविधा, तसेच अंतराळवीरांच्या सुरक्षेसाठी यानातून बाहेर येण्यास सक्षम कॅप्सूल या अशाच काही गोष्टी आहेत.