तुटलेल्या दोन्ही हातांचे यशस्वी प्रत्यारोपण !
By admin | Published: February 2, 2015 05:00 AM2015-02-02T05:00:24+5:302015-02-02T08:55:00+5:30
अपघातात गमावलेल्या दोन्ही हातांचे यशस्वी प्रत्यारोपण करण्याची किमया येथील एका खासगी इस्पितळातील डॉक्टरांनी केली
कोची : अपघातात गमावलेल्या दोन्ही हातांचे यशस्वी प्रत्यारोपण करण्याची किमया येथील एका खासगी इस्पितळातील डॉक्टरांनी केली असून, केवळ भारतातच नव्हे तर कोणत्याही विकसनशील देशात अशी विरळा शस्त्रक्रिया फत्ते होण्याची ही पहिलीच वेळ आहे. एवढेच नव्हे, तर गौरेतर कातडीचेही जगातील हे पहिलेच यशस्वी प्रत्यारोपण मानले जात आहे.
आध्यात्मिक गुरू माता अमृतानंदमयी यांच्या मठातर्फे चालविल्या जाणाऱ्या अमृता इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसच्या डॉक्टरांनी ही अभिमानास्पद कामगिरी पार पाडली. गेल्या १२ व १३ जुलै रोजी केलेल्या या दुहेरी प्रत्यारोपणाच्या यशाची २० दिवस खात्री केल्यानंतर डॉक्टरांनी याची माहिती जाहीर केली. मनू नावाच्या ३० वर्षांच्या व्यावसायिकाला या प्रत्यारोपणाने दोन्ही हात नवे बसविले आहेत. तीन वर्षांपूर्वी महिलेशी गैरवर्तन केल्याच्या संशयावरून सहप्रवाशांनी चालत्या रेल्वे गाडीतून ढकलून दिल्याने मनूला दोन्ही हात मनगट आणि कोपराच्या मध्यापासून गमवावे लागले होते. मनू आता ‘इव्हेन्ट मॅनेजमेंट’चा पूर्वीचा व्यवसाय पुन्हा करू शकेल. डॉक्टरांनी ‘ब्रेन डेड’ म्हणून जाहीर केलेल्या बिनॉय या २४ वर्षांच्या तरुणाच्या हातांचे प्रत्यारोपण मनूच्या हाताच्या तुटलेल्या खुंटांंवर केले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या बिनॉयवर गेले तीन आठवडे दुसऱ्या एका इस्पितळात उपचार सुरू होते. परंतु त्याचा काही उपयोग न झाल्याने डॉक्टरांनी बिनॉयला ‘ब्रेन डेड’ जाहीर केल्यावर त्याच्या नातेवाइकांनी दोन्ही हातांसह त्याच्या अवयवांचे दान केले. हातांचे दान केल्याबद्दल त्याने बिनॉय व त्याच्या कुटुंबीयांना धन्यवाद दिले. खरेतर प्रत्यारोपणानंतर हातांची हालचाल पुन्हा सुरू झाल्यावर त्याने पहिले वाक्य लिहिले, तेच मुळी ‘थँक यू बिनॉय’ असे होते.
प्रत्यारोपणानंतर १४ दिवसांनी मनूच्या शरीराने या दोन्ही परक्या हातांचा ‘स्वीकार’ केला आहे. मनूला आयसीयूमधून बाहेर आणण्यात आले असून, प्रत्यारोपित हातांची हालचाल नीट व्हावी यासाठी उपाय केले जात आहेत. सध्या त्याच्या कोपराखालील स्नायूंची हालचाल होत असून, त्यामुळे त्याला दोन्ही हातांची बोटेही हलविता येत आहेत. (वृत्तसंस्था)