‘विक्रम’ची भ्रमणकक्षा यशस्वीपणे आणली खाली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 05:06 AM2019-09-04T05:06:03+5:302019-09-04T05:06:19+5:30
चांद्रयान-२ मोहीम : शनिवारी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होणार
बंगळुरू : चांद्रयान-२ चे लँडिंग मोड्यूल ‘विक्रम’ची भ्रमणकक्षा पहिल्यांदाच मंगळवारी यशस्वीपणे खाली आणली गेली आणि आता भारतासाठी अत्यंत ऐतिहासिक असे काम राहिले आहे ते शनिवारी अगदी पहाटे चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगसाठी अंतिम कौशल्यपूर्ण कृतीचे. देशातच विकसित केलेले लँडर फक्त चार सेकंदांत भ्रमणकक्षेतून बाहेर काढण्याचे काम केले गेले. त्याच्या आदल्या दिवशी चांद्रयान-२ च्या भ्रमण कक्षेतून लँडर वेगळे केले गेले होते. हे काम महत्त्वाचा मैलाचा दगड ठरले. त्यामुळे भारताची दुसरी चांद्र मोहीम शेवटच्या आणि फारच महत्त्वाच्या टप्प्यात म्हणजे चंद्रावर सॉफ्ट आणि नियंत्रण असलेल्या लँडिंगकडे सरकली आहे, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) म्हटले.
चंद्राकडील या प्रवासातील सगळी कामे ३,८४० किलोग्रॅमच्या चांद्रयान-२ उपग्रहाच्या मुख्य आॅर्बिटरने पार पाडली आहेत. हा उपग्रह गेल्या २२ जुलै रोजी पृथ्वीच्या भ्रमणकक्षेतून अवकाशात सोडण्यात आला होता. सात सप्टेंबर रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘विक्रम’ उतरणार असून, त्याआधी इस्रो बुधवारी भ्रमणकक्षेतून बाहेर पडण्याची आणखी एक योजनाबद्ध कृती करणार आहे.
भारताची प्रतिष्ठा वाढणार
च्सात सप्टेंबर रोजी विक्रमचे यशस्वी लँडिंग झाले की, रशिया, अमेरिका आणि चीननंतर चंद्राच्या पृष्ठभागावर अलगदपणे लँडर उतरवणारा भारत जगात चौथा देश ठरणार आहे; परंतु चंद्राच्या आतापर्यंत शोधण्यात न आलेल्या दक्षिण ध्रुवावर ही पहिलीच मोहीम असेल. तीन सप्टेंबर, २०१९ रोजी चांद्रयान-२ उपग्रहासाठीची भ्रमणकक्षेतून पहिली बाहेर पडण्याची योजनाबद्ध कृती भारतीय प्रमाण वेळ ८.५० वाजता ठरल्याप्रमाणे सुरू झाली व ती कृती अवघ्या चार सेकंदांची होती, असे इस्रोने सांगितले. चांद्रयान-२ मोहिमेला ९७८ कोटी रुपयांचा खर्च आला आहे.