सरकारी नोकरदाराची अशीही फसवणूक; चहासाठी बोलवले अन् बळजबरीने लावले लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 07:42 PM2024-04-01T19:42:45+5:302024-04-01T19:44:15+5:30
मुलीच्या कुटुंबीयांनी स्वत:हून मुलीला परीक्षा देण्याच्या कारणास्तव मुलाकडे पाठवले होते
पाटणा - मुलगी पाहायला आले अन् लग्नच उरकून गेले किंवा साखरपुड्यातच उरकला विवाहसोहळा अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. समाजातून अशा घटनांचं कौतुकही झालं आहे. अनावश्यक खर्चाला फाटा देत साधेपणाने होणारे लग्न चर्चेचा आणि विचाराधीनतेचा मुद्दा बनतो. मात्र, बिहारमध्ये पकडौआ विवाह करण्यात आला असून चहा पिण्यासाठी निमंत्रण देऊन जबरदस्तीने विवाह लावण्याचा प्रकार घडला आहे. मुलीच्या लग्नासाठी कुटुंबीयांनी महसूल खात्यातील सरकारी नोकरीवाला मुलगा पाहिला होता. मात्र, आत्ताच लग्न करायचं नसल्याचे सांगतिल्यानंतरही मुलीच्या कुटुंबीयांनी जबरदस्तीने लग्न लावून दिल्याची घडना समोर आली आहे.
मुलीच्या कुटुंबीयांनी स्वत:हून मुलीला परीक्षा देण्याच्या कारणास्तव मुलाकडे पाठवले होते. त्यानंतर, मुलीचे अपहरण झाल्याची पोलीस तक्रार देण्यात आली. त्यामुळे, मुलगा संबंधित मुलीसोबत पोलीस ठाण्यात पोहोचला. त्यावेळी, कुटुंबीयांनी जवळील एका मंदिरात दोघांचा विवाह लावून दिला. एकदम फिल्मीस्टाईल लग्नाच्या घटनेची परिसरात जोरदार चर्चा असून पोलीस खात्यावरही संशय निर्माण झाला आहे. कारण, या लग्नसोहळ्याला मुलाच्या कुटुंबातील कोणीही सदस्य उपस्थित नव्हते, तरीही पोलिसांच्या उपस्थितीत हा विवाह कसा पार पडला.
छौडाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पतला गावातील निवासाही शाम नारायण महतो यांच्या मुलाबाबतीत ही घटना घडली आहे. मुलगा रिंटू कुमार सितामढी जिल्ह्याच्या कार्यालयात महसूल कर्मचारी आहे. दोन महिन्यांपूर्वी खदियाही गावातील रहिवाशी जागेश्वर प्रसाद यांनी त्यांची कन्या राणी चंद्रप्रभाच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, महूसल कर्मचारी असलेल्या मुलाने तुर्तास लग्न करण्यास नकार दिला होता.
शाम महतो यांनी सांगितले की, आमचा मुलगा एक महिन्यापूर्वी गावाकडे आला होता. त्यावेळी, मुलीच्या संबंधित नातेवाईकाने मुलीलाही तिकडेच बोलावून घेतले होते. त्यामुळे चहा पिण्यासाठी महसूल कर्मचारी मुलाला निमंत्रण दिले. त्यानुसार, मुलगा घरी आला आणि मुलीच्या हाताने बनविलेला चहा पिला. त्यानंतर, संबंधित नातेवाईकाने एकाची परीक्षा असल्याने तुमच्या रुमवर एक दिवसासाठी त्यांस ठेवावे, अशी विनंती मुलाकडे केली. मात्र, परीक्षा देण्याचं कारण सांगून आलेली ती व्यक्ती चंद्रप्रभा हीच होती. त्यामुळे, मुलालाही आश्चर्य वाटले. इकडे मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार देत, मुलीला लग्नाच्या बहाण्याने फूस लावून पळवून नेल्याचे म्हटले. त्यामुळे, चांगलाच गोंधळ उडाला होता.
विभूतीपूर पोलिस ठाण्यात मुलीच्या कुटुंबीयांच्या आग्रहास्तव मुलाचे आणि मुलीचे लग्न लावून देण्यात आले. मुलीच्या कुटुंबीयांना कट रचून हे लग्न केल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबीयांकडून होत आहे. दरम्यान, या लग्नप्रक्रियेत पोलिसांची भूमिकाही संशयात भोवऱ्यात आहे.