अशी आहे राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याची निमंत्रण पत्रिका, मोदींसह या मान्यवरांच्या नावांचा आहे समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 01:40 PM2020-08-03T13:40:30+5:302020-08-03T13:46:54+5:30
५ ऑगस्ट रोजी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अयोध्या - राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसतशी अयोध्येतील लगबग वाढत आहे. तसेच सर्वसामान्यांचीही या सोहळ्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या सावटाखाली होत असलेला हा भूमिपूजन सोहळा मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थिती होणार आहे. दरम्यान, या सोहळ्याचे निमंत्रण ठरावीक मान्यवरांपर्यंत पोहोचले असून, या सोहळ्याची निमंत्रण पत्रिकाही समोर आली आहे.
५ ऑगस्ट रोजी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील, असे या निमंत्रण पत्रिकेत म्हटले आहे. निमंत्रण पत्रिकेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबतच उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच निमंत्रक म्हणून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्यावतीने अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांच्या नावाचा निमंत्रण पत्रिकेत समावेश आहे.
दरम्यान, राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्यावतीने अध्यक्ष नृत्यगोपाल दास हे निमंत्रण पत्रिका पाठवत आहेत. या निमंत्रण पत्रिकेत लिहिले आहे की. श्री राम जन्मभूमी मंदिराचे भूमिपूजनआणि कार्यारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. तर विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित असतील. अयोध्येतील राम जन्मभूमी खटल्यात मुस्लिम पक्षकार राहिलेले इक्बाल अन्सारी यांनाही या भूमिपूजन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. श्रीरामाच्या इच्छेमुळेच मला या सोहळ्याचे निमंत्रण मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला दोन दिवसच राहिल्याने आता संपूर्ण अयोध्या राममय झाली आहे. अयोध्येतील अनेक मंदिरांची रंगरंगोटी झाली आहे. परिसर पताकांनी सजवण्यात आला आहे. तसेच राम मंदिराच्या भूमिपूजनासाठीच्या तीन दिवसीय अनुष्ठानास आजपासून सुरुवात झाली आहे. हे अनुष्ठान ५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल