अशी विधाने उच्चपदाला शोभत नाहीत... भाजपाची अन्सारींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 06:02 PM2017-08-10T18:02:45+5:302017-08-10T18:10:17+5:30
आता निवृत्तीनंतर राजकीय आश्रय शोधण्यासाठीच ते अशी विधाने करत आहेत, इतक्या उच्च पदावरील व्यक्तीने अशी विधाने करायला नको होती अशा शब्दांमध्ये भाजपाचे सरचिटणिस कैलाश विजयवर्गिय यांनी उपराष्ट्रपतींवर टीका केली आहे.
नवी दिल्ली, दि.10- मावळते उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी निवृत्त होताना शेवटच्या मुलाखतीत केलेल्या विधानानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. देशात मुस्लीम समुदायात असुरक्षिततेची भावना असल्याचे विधान त्यांनी काल केले होते. त्यावर भाजपाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गिय यांनी उपराष्ट्रपतीपदावरच्या व्यक्तीने असे विधान करणे त्यांच्या पदाला शोभा देत नाहीत अशी टीका केली आहे. इतकेच नव्हे तर हमिद अन्सारी आता पदावरुन मुक्त झाल्यावर पुन्हा राजकीय आश्रय शोधत आहेत त्यामुळेच त्यांनी असे विधान केल्याचीही टीका विजयवर्गिय यांनी केली.
अन्सारी यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना विजयवर्गिय म्हणाले, 'मी अशा विधानाचा निषेध करतो. आता निवृत्त होत असल्यामुळेच अन्सारी यांनी असे विधान केले आहे. ते अजूनही उपराष्ट्रपती आहेत आणि अशी विधाने त्यांच्या पदाला शोभत नाहीत. आता निवृत्तीनंतर राजकीय आश्रय शोधण्यासाठीच ते अशी विधाने करत आहेत, इतक्या उच्च पदावरील व्यक्तीने अशी विधाने करायला नको होती.'
'नवनिर्वाचित उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी देखिल अन्सारी यांच्या विधानाचा त्यांचे नाव न घेता समाचार घेतला. 'काही लोक भारतात अल्पसंख्यांक असुरक्षित असल्याचे सांगत आहेत, मात्र संपुर्ण जगाशी तुलना केली तर भारतामध्ये ते अधिक सुरक्षित असल्याचे दिसून येते.' भारतामध्ये सहनशिलता लोप पावत असल्याच्या टीकेलाही त्यांनी भारतीय समाज सर्वात जास्त सहनशिल असल्याचे सांगत सहनशिलतेमुळेच भारतात लोकशाही यशस्वी झाल्याचे नायडू यांनी स्पष्ट केले.
जर तर तुम्ही एखाद्या समुदायाला वेगळे काढून विचार करायला लागलात की इतर समुदाय त्याचा चुकीचा अर्थ काढतील. म्हणून तर सर्व समुदाय एकसमान आहेत, सर्वांना समान न्या आणि कोणाचेही लांगूलचालन होणार नाही असे आम्ही म्हणतो. आपल्या देशात अल्पसंख्यांकांशी भेदभाव केला जात नाही असा इतिहासच आहे. अल्पसंख्य़ांक आपल्या गुणांच्या बळावर उच्च पदांवर विराजमानही झाले आहेत. भारतामध्ये सर्वधर्मसमभाव सर्व लोकांच्या मनात आणि रक्तातच आहे. भारत धर्मनिरपेक्ष राजकीय व्यक्तींमुळे नाही तर लोक आणि इथल्या संस्कृतीमुळे आहे. अशा शब्दांमध्ये नायडू यांनी आपले मत व्यक्त केले आहे. नायडू यांनी जरी अन्सारी यांचे नाव घेतले नसले तरी हे मत त्यांच्या विधानाला उत्तर समजले जाऊ शकते.