इंडियन ऑइलच्या कार्यक्रमात अचानक लागला अश्लील व्हिडिओ, केंद्रीय मंत्री होते उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 04:09 PM2022-05-03T16:09:22+5:302022-05-03T16:09:34+5:30
या घटनेशी संबंधित लोकांची चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली यांनी दिले आहेत.
गुवाहाटी: शनिवारी तिनसुकिया येथील हॉटेल मिराना येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्र्यां समोरच अश्लील व्हिडिओ क्लिप लागल्याची घटना घडली. यावेळी केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली आणि आसामचे कामगार मंत्री संचय किसन यांना एका विचित्र प्रसंगाला सामोरे जावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन ऑइलने तिनसुकियामध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. येथे मिथेनॉल-मिश्रित M-15 पेट्रोलच्या पायलट रोलआउटच्या लॉन्चिंगदरम्यान ही घटना घडली. प्रत्यक्षात कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी स्टेजच्या मागे स्क्रीन लावण्यात आली होती, इंडियन ऑइलचे अधिकारी स्टेजवर बोलत असताना त्या स्क्रीनवर कथित अश्लील व्हिडिओ प्ले होऊ लागला.
काही सेकंदात व्हिडिओ हटवला
व्हिडीओ स्क्रीनवर येताच उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले. व्हिडिओ काही सेकंदांसाठी स्क्रीनवर दिसला, त्यानंतर तो लगेच काढून टाकण्यात आला. ही घटना काही लोकांनी आपल्या स्मार्ट फोनमध्ये रेकॉर्ड केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी तिनसुकिया पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधिकार्यांच्या मते, हा कार्यक्रम ऑनलाइन लाइव्ह-स्ट्रीम केला जात होता आणि इंडियन ऑइलच्या अधिकाऱ्याने झूम मीटिंग आयडी आणि पासवर्ड त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला होता. तेथूनच कोणीतरी हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.
झूम मीटिंगमधून व्हिडिओ शेअर केल्याची शक्यता
तिनसुकियाचे पोलिस अधीक्षक देवजीत देवरी यांनी मीडियाला सांगितले, "गुन्हेगाराने कदाचित ट्विटर अकाउंटवरुन मीटिंग आयडी आणि पासवर्ड घेतला आणि झूम मीटिंगमध्ये सहभागी होऊन अश्लील व्हिडिओ स्ट्रीम केला." या घटनेवर प्रतिक्रिया देताना रामेश्वर तेली म्हणाले की, "ती क्लिप मी पाहिली नाही, पण माझ्या पर्सनल असिस्टंटने मला याची माहिती दिली. या घटनेशी संबंधित लोकांची चौकशी करून त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी, असे निर्देश मी दिले आहेत.