सूधा मुर्ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर, हूमायूं आणि कर्णावतीच्या गोष्टीने नवा वाद; पाहा व्हिडिओ...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 06:45 PM2024-08-19T18:45:36+5:302024-08-19T18:46:08+5:30
रक्षाबंधन सणाची सुरुवात मुघल सम्राट हुमायून आणि राणी कर्णावतीमुळे झाल्याचे सुधा मूर्ती यांनी म्हटले आहे.
Sudha Murty : राज्यसभा खासदार सुधा मूर्ती (Sudha Murty) नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. आता रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात त्यांनी मुघल सम्राट हुमायून आणि चित्तोडच्या राणी कर्णावती यांची गोष्ट सांगितली आहे. या व्हिडिओमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. नेटीझन्स सुधा मूर्तींना या व्हिडिओमुळे प्रचंड ट्रोल करत आहेत.
पोस्टमध्ये नेमके काय आहे?
सुधा मूर्ती यांनी रक्षाबंधन सुरू करण्यामागे मुघल सम्राट हुमायून आणि राणी कर्णावती असल्याचे म्हटले. सुधा मूर्ती त्यांच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहितात, "16 व्या शतकात राणी कर्णावती संकटात होत्या, तेव्हा त्यांनी मदतीसाठी मुघल सम्राट हुमायूंकडे एक धागा पाठवला होता. येथूनच राखी पाठवण्याची परंपरा सुरू झाली आणि ती आजही सुरू आहे." या पोस्टमुळे सोशल मीडिया यूजर्स त्यांना ट्रोल करत आहेत.
सुधा मूर्तींनी सांगितली ती गोष्ट...
सुधा मूर्तींनी या पोस्टमध्ये एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. त्या म्हणतात की, "रक्षाबंधन हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा सण आहे. एक बहीण तिच्या भावाला रक्षासूत्र बांधते. आपल्या अडचणीच्या काळात भाऊ मदतीसाठी यावा, यासाठी हा धागा बांधला जातो. आपण इतिहासात डोकावून बघितले, तर जेव्हा राणी कर्णावतीच्या राज्यावर दुसऱ्याने आक्रमण केले होते, तेव्हा तिने मुघल सम्राट हुमायूनला धागा पाठवून रक्षण करण्याची विनंती केली होती."
Raksha Bandhan has a rich history. When Rani Karnavati was in danger, she sent a thread to King Humayun as a symbol of sibling-hood, asking for his help. This is where the tradition of the thread began and it continues to this day. pic.twitter.com/p98lwCZ6Pp
— Smt. Sudha Murty (@SmtSudhaMurty) August 19, 2024
"हुमायून दुसऱ्या देशातून आलेला असल्याने त्याला या धाग्याचा आणि संदेशाचा अर्थ समजला नाही. मग त्याने आपल्या लोकांना याबद्दल विचारले. त्याच्या लोकांनी हुमायूनला सांगितले की, हा बहिणीचा भावाला आलेला संदेश आहे. जेव्हा हुमायूला याचा अर्थ कळला, तेव्हा त्याने कर्णावतीच्या रक्षणासाठी ताबडतोब दिल्ली सोडली. पण त्याला तिथे पोहोचायला थोडा वेळ लागला, तोपर्यंत राणी कर्णावती मरण पावली होती. पण या कथेतून आपल्याला शिकायला मिळालेला धडा म्हणजे, बहीण अडचणीत असेल, तर ती आपल्या भावाला धागा पाठवून मदतीसाठी बोलावू शकते," अशी माहिती सुधा मूर्तांनी या व्हिडिओतून दिली.
नेटकऱ्यांनी धरले धारेवर...
सुधा मूर्तींच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. नेटकरी म्हणाले की, रक्षाबंधनाची सुरुवात महाभारत काळापासून झाली आहे. कृष्ण आणि द्रौपदी चांगले मित्र होते. युद्धात कृष्णाचे बोट कापले गेले, तेव्हा द्रौपदीने तिची साडी फाडून कृष्णाच्या बोटावर बांधली. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी तिला आपली बहीण मानले आणि तिचे रक्षण करण्याचे वचन दिले. महाभारत युद्ध झाले, तेव्हा युद्धात जाण्यापूर्वी द्रौपदीने कृष्णाच्या मनगटावर राखी बांधली होती.