दु:ख ठीक; आता मनेही जिंका! सांगताहेत CRPF चे माजी महासंचालक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 07:59 AM2019-02-21T07:59:20+5:302019-02-21T08:01:01+5:30

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या माझ्या माणसांसाठी मला अतीव दु:ख झाले. या हल्ल्याने संपूर्ण देश हळहळला हे खरे असले

Suffer right; Now win the man! Former Director General of CRPF | दु:ख ठीक; आता मनेही जिंका! सांगताहेत CRPF चे माजी महासंचालक

दु:ख ठीक; आता मनेही जिंका! सांगताहेत CRPF चे माजी महासंचालक

Next

ज्युलिओ रिबेरो

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या माझ्या माणसांसाठी मला अतीव दु:ख झाले. या हल्ल्याने संपूर्ण देश हळहळला हे खरे असले, तरी ज्यांनी पूर्वी त्या सुरक्षा दलाचे नेतृत्व केले अशा माझ्यासारख्याचा शोक अंमळ अधिक तीव्र आहे. तीन वर्षांहून थोडा अधिक काळ मुंबईचा पोलीस आयुक्त म्हणून काम केल्यानंतर काही आठवड्यांसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) महासंचालकपदाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली होती. त्यानंतर माझ्या सेवांची गुजरातमध्ये गरज असल्याचे पंतप्रधानांनी ठरविले.
त्याआधी मधल्या फळीत ‘सीआरपीएफ’मध्ये मी हैदराबादमध्ये रेंज जीआयजी म्हणून साडेतीन वर्षे आणि दिल्लीतील मुख्यालयात अडीच वर्षे प्रशासकीय पदांवर काम केले होते. या दलातील बहाद्दर जवानांच्या उत्तम कामगिरीची ज्यांना कल्पना नाही त्यांच्या तुलनेत ज्याने या दलात सहा वर्षे घालविली, त्या माझ्यासारख्याचे अश्रू अधिक अनावर होणे स्वाभाविक आहे.

भारतीय लष्कर आणि सीआरपीएफ यांच्यात एक मूलभूत फरक आहे. लष्कराची भरती प्रामुख्याने लढवय्या मानल्या गेलेल्या जातींच्या युवकांमधून केली जाते व त्यांच्या रेजिमेंटची रचनाही त्यानुसारच केलेली असते. ‘सीआरपीएफ’मध्ये मात्र संपूर्ण देशातून अधिक व्यापक प्रमाणावर भरती केली जाते. प्रत्येक बटालियनमध्ये सर्व राज्ये, समाजवर्ग, सर्व धर्म, सर्व जाती व सर्व भाषांना प्रतिनिधित्व मिळेल याची कटाक्षाने काळजी घेतली जाते. त्यामुळे अशा बटालियनमधील जवानांची हिंदी किंवा हिंदुस्तानी ही सामायिक भाषा बनते आणि ते समान खाणेपिणे व समान नीतिमूल्यांचे पालन करतात. हे जवान महिनोंमहिने कुटुंबांपासून दूर व बहुतांश वेळा अत्यंत खडतर परिस्थितीत राहत असतात.

या दलातील व्यक्ती ‘सीआरपीएफ’ला ‘चलते रहो प्यारे’ अशा पर्यायी नावाने ओळखतात. याचे कारण असे की देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात अशांतता निर्माण झाली की या दलाच्या बटालियनना लगेच तेथे रवाना केले जाते. त्यामुळे या जवानांचे आयुष्य सारखे फिरतीचे असते. येथे आज्ञेचे तत्काळ पालन करण्याचे शिक्षण सुरुवातीपासूनच दिले जाते. कमीतकमी बळाचा वापर करून दहशतवादी घटना किंवा हिंसक जमावाला कसे हाताळायचे याचे विशेष प्रशिक्षण या जवानांना दिलेले असते. म्हणून पूर्वी मी ज्या दलाला माझे म्हणत होतो त्या सीआरपीएफमधील ४४ प्रशिक्षित व ध्येयनिष्ठ जवान एका ‘फिदायीनी’ने घडवून आणलेल्या स्फोटात मृत्युमुखी पडावेत, याने माझे काळीच पिळवटून गेले.

हे टाळता आले असते का? सीआरपीएफच्या वाहनांचा ताफा ज्या रस्त्यावरून जायचा होता तो आधीच अधिक सुरक्षित करून घेता आला असता, असे अनेक जण म्हणतील. घरात आरामखुर्चीत बसून असे दोष देणे सोपे आहे. पण या लोकांना असे सांगावेसे वाटते की, असुरक्षित ठिकाणी काम करीत असताना सुरक्षा दलांचे सुरक्षित राहणे बहुधा नशिबावरही अवलंबून असते. दहशतवाद्यांना असे नशीब एकदा लाभले तरी त्यांचे काम फत्ते होऊ शकते! जीवावर उदार होऊन आत्मघाती बॉम्बस्फोट करण्यास निघालेल्या व्यक्तीने गुप्तहेरांना चकवा दिला आणि सुरक्षा फळी भेदली की त्याला रोखणे अशक्य असते. दहशतवाद्यांकडून केले जाणारे असे निकराचे प्रयत्न आधी डझनभर वेळा फोल ठरले तरी सुरक्षा व्यवस्थेतील छोटीशी उणीवही त्यांचा तेरावा प्रयत्न यशस्वी होण्यास पुरेशी असते! त्यामुळे अशा धोकादायक परिस्थितीत काम करणाºया सुरक्षा जवानांना अहोरात्र मिनिटागणिक सतर्क राहावे लागते.
खास करून सर्वसामान्य नागरिकांकडून असा दु:खावेग उत्स्फूर्त आणि जाहीरपणे व्यक्त होणे हे नक्कीच मानवी करुणेचे व देशप्रेमाचे लक्षण आहे. पण दहशतवाद व बंडखोरांच्या कारवायांमुळे काश्मीर किंवा अन्य काही ठिकाणीही विस्कळीत होणारी समाजजीवनाची घडी एवढ्यानेच सुरळीत होणार नाही. अप्रियतेचा धोका पत्करूनही मला असे सांगावेसे वाटते की, काश्मीरमधील दहशतवाद हा वेगळ्या प्रकारचा आहे आणि त्याची हाताळणीही वेगळ्या पद्धतीनेच केली जायला हवी.
पंजाबमध्ये खलिस्तानवादी दहशतवादाचा बीमोड करण्याचा त्या वेळचा पंजाब पोलीस दलाचा प्रमुख असलेला अनुभव, १९९८ मध्ये उत्तर आयर्लंडला गेलो असता तेथील दहशतवादाचा पोलिसांनी कसा मुकाबला केला, याची प्रत्यक्ष अधिकाºयांकडून घेतलेली माहिती याआधारे मी खात्रीने असे सांगू शकतो, की ही समस्या फक्त दंडुकेशाहीने कधीही पूर्णपणे सुटू शकणार नाही. अर्थात, हातात बंदूक घेऊन समोर येणाºया बंडखोरांची गय करून चालणार नाही, हे खरे. पण हे दहशतवादी ज्या समाजातून तयार होतात त्या समाजाचे मन जिंकण्यासाठी सोबतच काही केले नाही, तर या बंडखोर प्रवृत्तीला खतपाणी मिळतच राहील आणि एकाला मारला तर त्याच्या जागी त्याच्याहून अधिक कट्टर दहशतवादी येऊन उभा राहील. यामुळे फक्त बळाचा वापर करून हा असंतोष चिरडून टाकण्याच्या धोरणाचा फेरविचार होणे गरजेचे ठरते. एकीकडे ताकदीचा वापर करीत असतानाच दुसरीकडे स्थानिक जनतेमधील चांगुलपणाला साद घालण्याचे कामही करीत राहावे लागेल. हे करताना त्या लोकांकडे शत्रू म्हणून नव्हे, तर या देशाचे सन्मान्य नागरिक म्हणूनच पाहावे लागेल.


(लेखक ज्येष्ठ निवृत्त सनदी पोलीस अधिकारी आहेत)

Web Title: Suffer right; Now win the man! Former Director General of CRPF

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.