गोमांस तस्करीच्या संशयावरुन पोलिसांसमोर महिलांना मारहाण, लोक व्हिडिओ काढण्यात व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2016 10:34 AM2016-07-27T10:34:09+5:302016-07-27T12:32:46+5:30
गोमांस तस्करी करत असल्याच्या संशयावरुन दोन मुस्लिम महिलांना जमावाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
मध्यप्रदेश, दि. 27 - गोमांस तस्करी करत असल्याच्या संशयावरुन दोन मुस्लिम महिलांना जमावाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोलिसांसमोरच या स्वयंघोषित गोरक्षकांनी या महिलांना मारहाण केली. महिलांना मारहाण होत असताना जमलेले लोक त्यांना वाचवण्याऐवजी मोबाईल व्हिडिओ काढण्यात व्यस्त होते.
दोन मुस्लिम महिला गोमांस घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्यांना अटक करण्यासाठी रेल्वे स्थानकात पोहोचले होते. पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतलं असतानाही जमावाने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघींमधील एक महिला बेशुद्ध पडली तेव्हा जमावाने मारहाण करणं बंद केलं. तब्बल अर्धा तास या महिलांना मारहाण होत होती. आणि पोलिसांनी त्यांना वाचवण्याचाही साधा प्रयत्न केला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलांकडे 30 किलो मांस सापडले होते. तपासणी केली असता हे म्हशीचं मांस असून गोमांस नसल्याचं स्पष्ट झालं. महिलांकडे मांस विकण्याची परवानगी नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ज्यांनी काहीच तपासणी न करता विनाकारण या महिलांना मारहाण केली त्यांच्यावर मात्र काहीच कारवाई करण्यात आलेली नाही.